फोटोसेशन नको, हवाय मदतीचा हात
By Admin | Published: January 7, 2016 10:40 PM2016-01-07T22:40:56+5:302016-01-08T00:47:32+5:30
असंवेदनशीलतेचे दर्शन : अपघाताचे चित्रण सोशलमीडियावर ‘पोस्ट’ करण्याचे फॅड
सातारा : सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस एवढा व्यस्त झाला आहे की, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे सजगतेने पाहायलाही कोणाकडे वेळ नाही. तंत्रज्ञानाच्या या जमान्यात माणूसही यंत्राप्रमाणं भावनाशून्य बनत चालला आहे. माणसाची संवेदनशीलता हरवून गेलीय की काय याचा प्रत्यय रस्त्यावर घडणाऱ्या अपघातावेळी नेहमीच येतो. अपघातातील जखमी रस्त्यावर असह्य वेदनेनं तडफडत असताना त्याला मदत करण्यापेक्षा अपघातग्रस्त वाहनाचे फोटा मोबाईलमध्ये काढण्यात माणसं मश्गुल दिसतात. अशा वेळी मोबाईलमध्ये गुंतलेल्या हातांपेक्षा जखमीला वाचविण्यासाठी मदत करणारे हात पुढे यायला हवेत, अशीच भावना व्यक्त होत आहे.
पुणे-राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघात घडतात. कुणी जखमी होतो तर कुणाचा बळी जातो. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टर सांगतात की, थोडे लवकर आला असता तर कदाचित रुग्ण वाचला असता. अपघातातील जखमीला वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल या भीतीने जमलेल्या गर्दीतून तफडफणाऱ्या जखमीला मदत करण्यास हात पुढे येत नाहीत. जखमींना उचलून रुग्णालयात नेले आणि काही बरेवाईट घडले तर पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल. त्यामुळे उगीच अशा फंदात न पडलेले बरे, असाच विचार लोक करतात. पण वेळेत उपचार मिळाल्यास चांगले
घडू शकते, याचाही विचार
व्हावा. (प्रतिनिधी)
सोशलमीडियावर अपघाताचे चित्रण
रस्त्यावर अपघात घडल्यानंतर लगेचच बघ्याची गर्दी जमते. मात्र, जखमींना मदत करण्यासाठी सरसावणारा हात एखादाच; पण मोबाईलवर अपघाताचे चित्रण करणारे हातच जास्त पाहायला मिळतात. बुधवारी कृष्णा पुलानजीक झालेल्या अपघातातवेळी हेच पाहायला मिळाले. जो-तो खिशातील मोबाईल काढून अपघातग्रस्त कार, उलटलेला ट्रक, चिरडलेली दुचाकी यांचेच फोटो काढण्यात व्यस्त दिसत होता. चार दिवसांपूर्वी महामार्गावर झालेल्या अपघातात दोन बहिणींना जीव गमवावा लागला. घटना घडल्यानंतर काही वेळातच अपघाताचे फोटो सोशलमिडियावर झळकू लागले. काही तासांनंतर त्या अपघाताची व्हिडिओ क्लिपही दिसू लागली. आजची
जबाबदारीचं
भान हवं...
काळीज पिळवटून टाकणाऱ्या अशा घटनांचे चित्रण करणं, त्याचे छायाचित्र काढणं आणि ते सोशलमिडियावर प्रसारित करणं, यामागील हेतू ‘माहिती देणं’ हा असला तरी अपघातातील जखमींना मदत करण्याची जबाबदारीही आता स्वीकारायला हवी. माणसानं माणसाची मदत नाही करायची तर कोणाची करायची? केवळ आधुनिकता न मिरविता आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, अशी भावना ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.