‘न’च्या फेऱ्यात सारस यांचे नशीब फुलले!
By Admin | Published: July 10, 2014 12:33 AM2014-07-10T00:33:39+5:302014-07-10T00:35:59+5:30
नळजोड कंत्राटदार... नगरसेवक ते नगराध्यक्ष
सातारा : पालिकेत निवडून येण्याआधी सचिन सारस हे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नळजोड कंत्राटदार होते. पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येताच त्यांनी पालिकेचे कंत्राट घेणे बंद केले. नगरसेवकपद काही दिवस उपभोगल्यानंतर ते काही काळ पालिकेच्या मागासवर्गीय विशेष कल्याण समितीचे सभापतिपद झाले. यानंतर पुन्हा नगरसेवक म्हणून काम करत असताना नगराध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. सचिन सारस यांना ‘न’ चा फेरा भलताच फलदायी ठरत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. सर्वात तरुण नगरसेवक असणारे सारस हे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नळजोड व लिकेज काढण्याचे ठेके घेत. ते या कामात तंत्रकुशल असल्याने नळजोडाची असंख्य कामे त्यांनी स्वत: केली आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. कंत्राटांची कामे करून घराला हातभार लावणाऱ्या सारस यांना आमदारांनी नगरसेवकपदाची संधी दिली. मागील निवडणुकीत ते निवडूनही आले. नगरसेवकपद मिळाल्यानंतर पालिकेचे कोणतेही ठेके घेता येत नसल्याने त्यांनी ते बंद केले. प्रभागातील समस्या सोडवत असतानाच त्यांना आरक्षणामुळे नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यांच्याच आघाडीच्या हेमा तपासे यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते; परंतु सारस यांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे. (प्रतिनिधी)