दवाखाना परिसरातीलच सांडपाण्याचा निचरा होईना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:37 AM2021-04-15T04:37:59+5:302021-04-15T04:37:59+5:30
वडूज : तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहरातील दिशाहीन गटारे असल्याकारणाने दैनंदिन वाहणारे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या परिसरातील ...
वडूज : तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहरातील दिशाहीन गटारे असल्याकारणाने दैनंदिन वाहणारे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर दवाखाने परिसरातीलच सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दवाखान्यातील गरोदरपणात दाखल झालेल्या माता आणि बाळ यांचे आरोग्य ‘राम भरोसे’ ठरत आहे.
वडूज ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊन तब्बल चार वर्षे लोटली तरी आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असलेल्या या सांडपाण्याचा निचरा होत नाही. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने फार गंभीर असून खेदजनकही आहे. या प्रभागातील नगरसेवक आणि नगरपंचायत प्रशासन यांच्यात ताळमेळच नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. या प्रभागातील नेतेमंडळीही सोयीस्करपणे या गंभीर विषयावर टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कोरोना महामारीचा उद्रेक होत असताना या बाबीकडे देखील नगरपंचायत प्रशासनाकडून डोळेझाक का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मूळ जागा मालक व सद्यस्थितीतील प्लाॅटधारक यांच्यात प्रसंगी वादविवादही झालेलेच आहेत. या परिसरातील सांडपाणी हे नैसर्गिक वाहत्या बाजूने होणे क्रमप्राप्त असताना संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या परिसरातील नागरिकांचे आरोग्य कायम धोक्यात असलेतरी त्यांची अवस्था ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशीच झाली आहे. या संदर्भात वेळोवेळी नागरिकांनी तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, निद्रीत अवस्थेत असलेल्या नगरपंचायत प्रशासनालाही जाग तरी कधी येणार याकडे सोशिक नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोट :
या सांडपाण्याचा निचरा होणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असताना जाणीवपूर्वक नगरपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रश्न मार्गी लागला नाही तर जन आंदोलन उभारून न्याय मागू.
चेतन गोडसे, वडूज
कोट :
मूळ जागा मालक व नगरपंचायत प्रशासन यांची वेळोवेळी या गटार व्यवस्थेबाबत चर्चा झाली होती. मात्र, समन्वयाची भूमिका या विषयी असणे आवश्यक आहे. लवकरच हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.
शशिकांत पाटोळे, माजी उपसरपंच वडूज
फोटो ओळ : वडूज शहरातील दवाखाना परिसरातच साचलेले सांडपाणी.