नाही गाव, पण विहिरीमुळं मिळालं नाव!
By Admin | Published: March 10, 2015 11:23 PM2015-03-10T23:23:59+5:302015-03-11T00:06:21+5:30
पेशवेकालीन जोशी विहीर : महसूल खात्याच्या दफ्तरी नोंद नसलेलं एक आगळंवेगळं ठिकाण
राहुल तांबोळी - भुर्इंज पुणे बंगळूर महामार्गावर भुर्इंज आणि कवठ्याच्या मध्ये एक थांबा आहे. जोशीविहीर या नावाने प्रसिद्ध असलेले हे ठिकाण सध्या अनेकांना एका गावाप्रमाणे भासते. मात्र अश्चर्य वाटेल, की जोशीविहिर या नावाचे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणि महसूली विभागाच्या खात्यावर नोंद नसले तरी एका विहिरीमुळे या ठिकाणाला एका गावाप्रमाणे नाव मिळाले आहे. तरीही एका गावाप्रमाणे रुपडे प्राप्त केलेल्या या ठिकाणाचा इतिहास फारच रंजक आहे. इतिहासकाळात शिवाजी महाराजांनी खंडाळा अथवा वाठार या दुष्काळी भागातून आलेल्या सैन्याला पिण्याच्या पाण्यासाठी जागा असावी म्हणून ३५ फूट खोल अशी शिवपिंडीच्या आकाराची विहिर येथे खोदली. त्यावेळी या ठिकाणाला टप्पा म्हणून ओळखले जायचे. टप्प्यावर थांबा असाच निरोप त्या काळी जायचा. पेशवेकाळात मूळच्या बदेवाडी(भुर्इंज) येथील जोशी समाजातील एकाने छत्रपतींना साताऱ्यात जाऊन त्यांचे भविष्य सांगितले. ते खरे ठरल्याने त्यांना हे ठिकाण इनाम दिले. त्यामुळे जोशी कुुटुंब येथे वास्तव्यास आले. पूर्वीच्या काळी या ठिकाणी अवघे एकच जोशींचे घर होते. त्यांच्या मालकीची ही विहीर झाली. भुर्इंज किंवा सुरुर पासून कोणीही वाई, फलटण , बारामतीकडे निघाले की जोशींच्या घरापाशी येऊन तेथून आपला पुढचा प्रवास सुरू करे. त्यावेळी एकमेकाला निरोप देताना जोश्याच्या विहीरीवर भेटू, असे सांगितले जायचे. आणि त्यातूनच या ठिकाणचे नाव जोशीविहीर झाले. सध्या या ठिकाणी जोशी कुटुंबाची पाचवी पिढी राहत आहे. आणि त्यांची ही विहीरही १२ महिने तुडुंब भरलेली असते. जोशीविहीरच्या बहुतेक साऱ्या उद्योगांना पिण्यासाठी आजही या विहिरीचे पाणी दिले जाते. तसेच शेतीसाठीही या विहिरीचे पाणी वापरले जाते. या विहिरीचे पाणी पिण्यासाठी आजही वापरले जात असल्याने त्याच्यावर आच्छादन केले आहे. त्यामुळे ही विहीर बाहेरून दिसत नाही. जोशीविहीर नावाचे हे ठिकाण अनेकांना गाव भासत असले तरी प्रत्यक्षात या विहीराचा भाग आनेवाडी व भुर्इंजच्या हद्दीत येतो. मात्र जोशीविहीर या नावाने व्यापारी पेठेचा परिसर विकसित झाला असला तरी या नावाचे गाव महसुली दप्तरी अस्तित्वात नाही. त्यामुळेच जोशीविहीरचे आगळेवेगळेपण उठून दिसते. पानपट्टीपासून कापड दुकानांपर्यंत सर्वकाही.. पुणे बंगळूर महामार्गावर वाठार वाई रस्ता जेथे छेदतो त्या ठिकाणी असलेले जोशीविहीर सध्या मोठी बाजारपेठ झाले आहे. या ठिकाणी अगदी पानपट्टीपासून सर्व प्रकारच्या दुकानांपर्यंत आणि विविध बंगले ते थेट मंगल कार्यालयापर्यंत येथे काही नाही असे नाही. पांथस्थांचा पाणवठा... या विहिरीवर पाणी पिण्यासाठी पांथस्थ थांबत. अगदी वाठारला रेल्वेतून आलेले ब्रिटिश महाबळश्वरकडे जाताना या ठिकाणीच पाणी पिण्यासाठी थांबत. पेशवेकाळात आमच्या पूर्वजांना ही जागा छत्रपतींकडून इनाम मिळाली. पण ज्या विहिरीमुळे आमच्या कुटुंबाचे नाव अजरामर झाले ती विहीर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली आहे. - बाळासाहेब जोशी, वारस ही विहीर सध्याच्या काळात दुर्लक्षित असली तरी त्याचे महत्त्व नावाच्या रूपाने कायम राहिले आहे. ज्या नावाचे गावच नाही त्या ठिकाणाला एका विहिरीमुळे गावाप्रमाणे लौकिक प्राप्त व्हावा, ही दुर्मिळ गोष्ट असावी. - प्रशांत भोसले-पाटील नावामागची कहाणी-तीन