पाटाचं पाणी नाही आलं; पोटपाणी मात्र अवघड केलं !
By admin | Published: June 1, 2015 12:41 AM2015-06-01T00:41:27+5:302015-06-01T00:51:57+5:30
महू-हातगेघर कालवा : रखडलेल्या कामामुळे शेतकऱ्यांच्या काळजात ‘कालवाकालव’
नीलेश भोसले - सायगाव जावळी तालुक्यातील सायगाव पश्चिम विभाग हा पूर्वीपासून कोरडवाहू म्हणून ओळखला जातो. येथील पाणीप्रश्न हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला आहे. अनेक पंचवार्षिक निवडणुका आल्या आणि गेल्या. ना पाट झाला ना पाणी आलं. पोटपाणी मात्र अवघड झालं, अशी स्थिती येथील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांची झाली असल्याचे दिसून येत आहे.
निसर्ग कधीच पक्षपात करीत नाही. निसर्ग कधीच अनुशेष ठेवत नाही. निधी अडकला म्हणून पाऊस वर्षानुवर्षे रखडत नाही. बीलं अडकली म्हणून पाऊस पडायचा थांबत नाही. पण, येथील पाणीप्रश्न वर्षानुवर्षे तसाच आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात वळिवाचा पाऊस पडला. या पावसाने काही ठिकाणी नुकसानही केले. तसेच जावळी तालुक्यातील सायगाव विभागालाही या वळिवाच्या पावसाने झोडपून काढले. पाऊस, एवढा मोठा होता की रखडलेले कालवे चक्क पाण्याने वाहू लागले होते. निसर्गाच्या औदार्याचीच प्रचिती यानिमित्ताने येथील जनतेला व शेतकऱ्यांना अनुभवायास मिळाली.
जावळी तालुक्यातील सायगाव पश्चिम विभाग हा पूर्वीपासून कोरडवाहू म्हणून ओळखला जातो. येथील पाणीप्रश्न हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणीप्रश्न समोर आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर आश्वासनेही देण्यात आली होती. पण, येथे ना पाट झाला ना पाणी आलं. अशी स्थिती येथील झाली आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या सायगाव विभागावर राहिली आहे. दोन वर्षांपूर्वी महू-हातगेघर धरणांतर्गत कालव्याची खोदकामे करण्यात आली. दोन वर्षे पूर्ण होऊनही ना पाट पूर्ण झाले ना पाणी आले.येथील संपादित झालेली जमीन मात्र, कालव्याखाली गेल्याने ‘तेलही गेले अन तूपही गेले’ अशी स्थिती येथील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. याचा विचार होण्याची गरज आहे.
प्रश्न आहे तरी काय ?
या कालव्यासाठी खूप मोठं क्षेत्र संपादित झालं आहे. काही शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी या कालव्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा उपजीविकेचा प्रश्न बिकट झाला आहे. खोदकामाच्या दोन्ही बाजूस अंदाजे तीस फूट जमिनी पडिक राहिल्याने त्याक्षेत्रावर आता कुसळही उगवत नाही. खोदकामामधून आता झाडे उगवून आली आहेत. तर काही ठिकाणी चक्क बैलगाड्या जाऊन चाकोऱ्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे हा कालवा आहे की दुसरे काय ? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांत साशंकताच...
शशिकांत शिंदे हे जलसंपदामंत्री झाले. येथील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या. परंतु कालव्याचे काम पुढे न सरकल्याने व जमिनीही कसता येत नसल्याने दोन्ही बाजुंनी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. याप्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ठोस पावले उचलणार की पंचवार्षिकची वाट पाहवी लागणार याबाबत शेतकऱ्यांत साशंकताच आहे.