आल्याला नाही भाव;बळीराजावर घाव!
By admin | Published: April 23, 2017 10:44 PM2017-04-23T22:44:04+5:302017-04-23T22:44:04+5:30
खटावमधील शेतकरी चिंतेत : पाण्याचे स्त्रोत आटले; नवीन आले पिकाची लागण कमी होणार
केशव जाधव ल्ल पुसेगाव
पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे पुसेगाव परिसरात नगदी पीक म्हणून केलेल्या आले पिकाची पाण्याअभावी जोपासना करताना शेतकरी वर्गाला नाकीनऊ आले आहे. पाण्याचे स्त्रोत आटल्याने तसेच विहिरींची पाण्याची पातळी खालावल्याने पिकाला द्यायला पाणी नाही अन् बाजारपेठेत दर नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
दरम्यान, या स्थितीत पीक काढले तर शेतकऱ्याने वर्षभर घातलेले भांडवल सुद्धा निघणार नाही. आता आले पीक हेही शेतकऱ्यांना गोत्यात आणणार अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच यावर्षी विहिरीत उपलब्ध अल्प पाणीसाठा, अद्याप वळवाच्या पावसाची चिन्हे नाहीत, अशी स्थिती तसेच गेल्या दोन वर्षांपासून आले पिकाला दर नसल्याने चालूवर्षी या भागात नवीन आले पिकाची लागण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गतवर्षी अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून या पुसेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेकडो एकर क्षेत्रावर सातारी, औरंगाबादी आदी प्रकारच्या आले पिकाची मोठ्या प्रमाणात लागण केली. एकरी दोन गाड्या म्हणजे १० क्विंटल आल्याचे बियाणे लागते. सुमारे २० हजार रुपये प्रति गाडी भावाने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले होते. ४ हजार रुपये दराने शेणखताची एक ट्रॅक्टर ट्रॉली अशा एकरी ८ ट्रॉल्या खत शेतात घातले होते. तर लागणीचा भाव त्यावेळी एकरी ६ हजार इतका होता. पहिल्यापासूनच पाण्याचा प्रश्न असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी एका एकरासाठी सुमारे ४५ ते ५० हजार रुपये खर्च करून शेतात ठिबक सिंचन केले. आले पिकाला वर्षातून दोनदा मातीची भर घालण्यासाठी पैसे खर्च करावे लागले. वेळोवेळी औषध फवारणी, आळवणी, आंतरमशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे. म्हणजे आले पिकासाठी शेतकऱ्यांना एकरी सुमारे १ लाख १० हजार रुपये इतकी गुंतवणूक करावी लागली आहे.
मात्र, या पिकाच्या दरात गेल्या दोन वर्षांपासून कमालीची घसरण झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. बाजारपेठेत आजमितीला एक गाडी (५ क्विंटल) आले विक्रीचा भाव साडे चार ते पाच हजार रुपये इतका आहे. शेतकऱ्याने घातलेले भांडवल सुद्धा त्याला या पिकातून परत मिळत नाही. जर शेतकऱ्यांनी आले दिडीने (आणखी ६ महिने शेतात) ठेवायचे म्हटले तरी सध्या विहिरी कोरड्या पडल्याने या पिकाला पाणी देण्यासाठी कोणताही पर्याय त्यांच्या जवळ राहिला नाही. चार दिवसांतून तास-दीड तास ठिबकद्वारे पाणी देऊन आले पिकाची जोपासना करताना शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. पाणी दिल्यानंतर पिकाची ओल उडून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आल्याच्या बेड वर कलिंगड, भोपळा, काळा घेवडा लावून तसेच गव्हाचा भुसा टाकून उन्हापासून पिकाचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
यावर्षी शेतातील बियाण्यांवरच भर...
औरंगाबाद व अन्य बाजारपेठेतून व्यापाऱ्यांनी आणलेल्या आल्याच्या बियाण्याला या परिसरातील शेतकरी वर्गातून मोठी मागणी असते. दरवर्षी पुसेगाव बाजारपेठेतून आले बियाण्याचे सुमारे २५० ट्रक विकले जातात. मात्र, यावर्षी आले पिकाच्या बियाण्यांचा विक्रीचा भाव कमी असून सुद्धा या पिकाला दर नसल्याने शेतकऱ्यांनी या लागवडीकडे पाठ फिरवल्याचे जाणवत आहे. या पिकाची जोपासना करण्यासाठी वर्षभर होणाऱ्या खर्चाचा विचार करता यावर्षी बहुतांशी शेतकऱ्यांनी आले पिकाच्या लागणी करता आपल्याच शेतातील बियाणे वापरावर भर दिला आहे.