घुंगराचा आवाज खेची दुष्काळग्रस्तांचे पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:06 PM2019-05-12T23:06:01+5:302019-05-12T23:06:16+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात सूर्यनारायण आग ओकत आहेत. गेल्या आठवड्यात सरासरी ४३ अंश सेल्सिअसच्या घरात तापमानाचा पारा पोहोचला होता. ...
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात सूर्यनारायण आग ओकत आहेत. गेल्या आठवड्यात सरासरी ४३ अंश सेल्सिअसच्या घरात तापमानाचा पारा पोहोचला होता. त्यामुळे माणदेशी माणसाचा जीव कासावीस होत आहे. या जीवाला थंड करण्यासाठी गावोगावी फिरते रसवंतीगृह येऊ लागले आहेत. त्यातील घुंगराचा आवाज आला की, आपसूक जीवाला थंड करण्यासाठी माणसांची पावले त्याकडे वळत आहेत.
माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथे आठवडा बाजारातील खळखळाट करून मंत्रमुग्ध करणाऱ्या घुंगराचा आवाज ऐकवत चालत्या फिरत्या टमटममध्ये ताजा उसाचा रस मिळत असल्याने नागरिकांची पावले आपोआप त्या दिशेने वळत आहेत. आधीच दुष्काळ त्यातच कडक उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिकांची दमछाक होत आहे. अशातच उसाचा रस पिल्याने मनाला व शरीराला थंडावा मिळत आहे.
ग्रामीण भागातील भरणाºया आठवडा बाजारात शरीराला थंडावा देणाºया कलिंगड, काकडीसह उसाच्या रसाची विक्री जोमाने सुरू आहे. कडक उन्हातून दमून भागून आलेले बाजारकरी उसाचा रस पिऊन मन शांत करत आहेत.
मे महिन्यात सूर्यनारायण कोपला असल्याने वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने अशातच कानावर रसवंतीगृहाच्या घुंगराचा आवाज कानावर पडला की, थंडगार उसाचा रस पिण्यासाठी बाजारकरू, नागरिकांची धांदल उडत आहे.
उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शीतपेयांना खूप मागणी असते. यामध्ये जास्तकरून उसाचा रस व नारळपाणीही पिले जाते. लिंबू, आलेयुक्त उसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला टवटवीत आणि ताजेतवाणे करीत असतो. वर्षानुवर्षे भारतीयांच्या आवडीचे असणारे हे पेय आजही लोक मोठ्या आवडीने पीत असतात.
गुºहाळांंच्या चाकांना लावलेल्या घुंगराच्या मधूर आवाजाने जाणाºया-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. दूरवरून येणारा आवाज ओळखूनच माणूस आता आपण रस घेऊया, असे म्हणत रसवंतीगृहाकडे त्यांची पावले आपोआप वळताना दिसत आहेत.
शीतपेयांवर जालीम उपाय
उसाचा रस हा उन्हाळ्यात थंड होण्यासाठी वापरला जाणारा पूर्वापार जुना व्यवसाय. याच्या जोडीलाच लिंबू सरबत, नारळाचे पाणी वापरले जात असते. मध्यंतरीच्या काही वर्षांमध्ये शीतपेयांनी बाजारात आक्रमण केले. या कंपन्यांनीही तरुणांना याकडे आकर्षित केल्यामुळे युवकांबरोबरच ज्येष्ठ मंडळीही शेतपेयाकडे वळाली होती; पण आता उसाचा रस पिण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे फिरत विक्री करणाºयांनाही चांगले दिवस आले आहेत. त्यांना चांगला रोजगार मिळत आहे.
रस ठिकंय; पण बर्फाचे प्रश्न
रसवंती गृहावर मिळणारा रस हा सकस आणि आरोग्यवर्धक असतो. मात्र, हा रस थंड करण्यासाठी वापरण्यात येणाºया बर्फाबाबत अनेकांच्या मनात शंका असते. बर्फ गोणपाटामध्ये ठेवण्यात आलेला बर्फ खाण्यासाठी योग्य असेलच असे नाही. सोशल मीडियावरही रस्त्यावर वापरला जात असलेला बर्फ खाण्यायोग्य नसल्याच्या पोस्ट फिरत असतात. त्यामुळे हा बर्फही आरोग्यासाठी चांगला असेलच, याची कोणाला खात्री देता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक बर्फ कमी टाकून किंवा न टाकता देण्याची मागणी करतात.