सातारा पोलिसांची नॉनस्टॉप ड्युटी १०० तास,जिल्ह्याची शांतता अबाधित : धार्मिक यात्रा, नववर्ष आणि कडकडीत बंद यशस्वी हाताळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:14 AM2018-01-05T01:14:45+5:302018-01-05T01:17:48+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे
सातारा : सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत होत्या. मात्र, सातारा जिल्हा पोलिसांनी सलग १०० तास ड्युटी बजावून कडक पहारा देत जिल्ह्यात अपवादात्मक घटना सोडता बंद शांततेत हाताळला गेला.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. त्यात गेल्या आठवड्यापासून पालचा खंडोबा, मांढरगडावरील काळूबाई, औंधची यमाईदेवी येथील यात्रा सुरू असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलिसांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे जिल्ह्यातील १५० पोलिस अधिकारी, २५०० कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुटी व रजा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यात ३१ डिसेंबर रोजी कोणत्याही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.
महाबळेश्वर व पाचगणीमध्ये वाहतूक कोंडी आणि पर्यटकांना मोकळे वातावरण निर्माण करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. त्याचबरोबर यात्रा काळात लाखो भाविकांची गर्दी होत असताना पोलिसांवर वाहतूक व गर्दीचे नियंत्रण करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचाराची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जाळपोळ, दगडफेक आदी घटना घडण्यास सुरुवात झाली. राज्यात घडणाºया घटनेचे जिल्ह्यात लगेच पडसाद उमटू लागले. फलटण आणि कºहाड येथे काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. सातारा पोलिसांनी सतर्कता दाखवून तत्काळ घटनास्थळी कारवाई करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्याच दिवशी प्रत्येक पोलिस ठाणेनिहाय विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जाती-धर्माच्या लोकांची शांतता बैठक घेतली. त्यांना अफवांवर विश्वास ठेवू नका, शांततेत बंद पाळा, असे आवाहन केले.
दुसºया दिवशी सकाळपासून सर्वत्र बंद पुकारल्याने कोणत्याही हिंसाचाराच्या घटना होऊ नयेत, जी काही दुकाने उघडी होती त्यांना बंद करण्याचे आवाहन केले. तसेच संशयित कार्यकर्त्यांच्या हलचालींवर लक्ष ठेवून प्रत्येक चौकात आणि संवेदनशील ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काही ठिकाणी दगडफेक व हिंसक कारवाई होत असल्याचे निदर्शनास येतच पोलिसांनी तत्काळ संशयितांना ताब्यात घेऊन जमाव पांगवला. दरम्यान, त्यांना सोडवण्यासाठी जमावाने पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या संशयितांना समज देऊन सोडले.