कोरेगाव उत्तर भागात सत्तेसाठी संघर्ष!

By Admin | Published: July 29, 2015 09:33 PM2015-07-29T21:33:38+5:302015-07-29T21:33:38+5:30

अनेक ठिकाणी लक्षवेधी लढत : राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

North Korea's struggle for power in North! | कोरेगाव उत्तर भागात सत्तेसाठी संघर्ष!

कोरेगाव उत्तर भागात सत्तेसाठी संघर्ष!

googlenewsNext

संजय कदम -वाठार स्टेशन -कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचारात आता चांगलाच रंग भरला आहे. या भागातील लक्षवेधी ठरणाऱ्या बहुतांशी ग्रामपंचायतींत सत्तांतर होईल, अशीच सध्या परिस्थिती दिसत आहे. सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा विरोधक वाचत आहेत. तर दुसऱ्या बाजूने विकासामुळे सत्तेचा कौल आम्हालाच राहणार या भूमिकेत सत्ताधारी मंडळी आहेत. या बाबतचे चित्र ६ आॅगस्ट रोजी स्पष्ट होईलच; परंतु आतापासूनच आडाखे बांधणीला राजकीय मंडळी लागली आहेत. कोरेगावच्या राजकारणात नेहमीच भरीव बाजू मांडणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेते मंडळींची मात्र या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या एकूण १३ जागांसाठी जवळपास ३५ जण निवडणूक रिंगणात आहेत. गत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीतील दोन गट विभक्त लढल्याचा सत्ताधारी तिसऱ्या आघाडीला फायदा झाला होता. यावर्षी हे दोन्ही गट सत्ताधाऱ्याला पाणी पाजण्यासाठी एकत्र आले असले तरी गावातील युवा आघाडीने तिसरा पॅनेल टाकत या निवडणुकीत रंगत आणली आहे. यामुळे या युवा आघाडीचा फटका नक्की कु णाला बसणार? हे आताच सांगणे अवघड झालेले आहे. पक्षीय सत्तेच्या बळावर वाठार स्टेशनमध्ये कोट्यवधींचा विकास केल्याचा दावा राष्ट्रवादीचे नागेश जाधव यांनी करीत सत्तांतरासाठी प्रचारात जोरदार मुसंडी घेतली आहे. तरीही गावच्या पाणीप्रश्न हाच या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असल्याने या मुद्द्याावरच या गावची ग्रामपंचायत लक्षवेधी ठरणार आहे.
राष्ट्रवादीसाठी वाठार स्टेशनची सत्ता ही प्रतिष्ठा मानली जात आहे. कोरेगावच्या सभापती रूपाली जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य अंकुशराव जाधव, माजी सरपंच नागेशशेठ जाधव यांनी सत्ताधारी महाआघाडीपुढे आव्हान निर्माण केले आहे. सत्ताधारी आघाडीचीच सत्ता कायम ठेवण्यासाठी सरपंच अमोल आवळे, शिवसेनेचे शामराव चव्हाण, भाजपचे मनोज कलापट, संजय माने, सदाशिव गायकवाड, अजय चव्हाण, किसन माने यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
सोळशी ग्रामपंचायतीवर सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर यांचे प्राबल्य आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत बाळासाहेब सोळस्करांना साथ देणारे राष्ट्रवादीचे प्रमोद सोळस्कर यांनी आता सर्वपक्षीयांना एकत्रित करीत बाळासाहेब सोळस्करांच्या विरोधात ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविण्याचा चंग बांधला आहे. सोळस्करापुढे चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. यामुळे सोळशीतील निवडणूक लक्षवेधी मानली जात आहे.
नांदवळ ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मूळगावची असल्याने निवडणुक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका अजित पवारांनी मांडूनही राष्ट्रवादी अंतर्गत दोन्ही गट सत्तेसाठी आमने-सामने आले आहेत. या ग्रामपंचायतीवर सध्या पूर्वाश्रमीचे माजी मंत्री शालिनीताई पाटील समर्थक शिवाजी पवार व भूषण पवार यांची सत्ता आहे. मात्र मागील पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी या ग्रामपंचायतीचा वापर स्वहितासाठी केल्याचा आरोप विरोधकाकडून होत आहे. या ग्रामपंचायतीच्या एकाकी कारभाराविरोधात काही महिन्यांपूर्वीच पाच सदस्यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून या कारभाराचा निषेध व्यक्त केला होता. या सत्ताधाऱ्याविरोधात विरोधी गटाने आव्हान निर्माण केले आहे.
अंबवडे (सं) वाघोली ग्रामपंचायत सुरेश सकुंडे यांच्या विचारांची आहे. मात्र, या गावचे राष्ट्रवादीचे नीलेश जगदाळे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून गावात केलेल्या विकासामुळे त्यांनी निवडणुकीपूर्वीच बाजी मारत ९ पैकी ६ जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात घेत परिवर्तन घडविले आहे. आता तीन जागांसाठी या ठिकाणी निवडणूक होत आहे.
अरबवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे नाना भिलारे यांच्या गटाचे वर्चस्व आहे. मात्र, त्यांनी पाच वर्षांत हुकूमशाही राजवट राबवत या ग्रामपंचायतीचा कारभार केल्याचा आरोप विरोधी गटाकडून होत आहे. या गावात परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रवादीचे तानाजी गोळे यांनी आव्हान निर्माण केले आहे.

दुरंगी लढती लक्षवेधी...
बिचुकले, तळिये, चौधरवाडी, रेवडी, तडवळे (सं) वाघोली या ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
दहिगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या गटाचे वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविण्यासाठी दहिगाव सोसायटीचे अध्यक्ष रामबाबा चव्हाण व किसन वीर कारखान्याचे संचालक विजय चव्हाण यांनी सत्ताधारी गटापुढे आव्हान निर्माण केले आहे.
एकूणच या निवडणुकीत कोरेगाव तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या नेतेमंडळींची त्यांच्याच गावातील विरोधकांनी चांगलीच दमछाक केल्याचे दिसत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. त्यामुळे कोरेगाव उत्तर भागाकडे सर्वांचेचे लक्ष लागले आहे.

Web Title: North Korea's struggle for power in North!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.