नाक, तोंड रिकामे; मास्क गळ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:22+5:302021-07-12T04:24:22+5:30
कऱ्हाड : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. विविध नियमांद्वारे संसर्ग थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने ...
कऱ्हाड : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. विविध नियमांद्वारे संसर्ग थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. मास्क वापरणे बंधनकारक असले तरी नाक, तोंड रिकामे ठेवून मास्क गळ्यात लटकवण्याची सध्या ‘फॅशन’च झाल्याचे चित्र आहे. कारवाई टाळण्यासाठी अनेकजण मास्क वापरल्याचा दिखावा करीत आहेत.
कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाच प्रशासनाने विविध उपाययोजनांद्वारे संसर्ग थोपविण्याचा प्रयत्न सुरू केला. लॉकडाऊन, जमावबंदी, सॅनिटायझर वापर, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर आदी उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या. मध्यंतरीच्या कालावधीत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे एकमेकांशी संपर्क येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, सध्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून, सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने कडक धोरण अवलंबून सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या अमाप असल्याचे दिसते.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला अनेकांनी तिलांजली दिल्याचे दिसते. दुकानामध्ये गर्दी करून मालाची खरेदी-विक्री बेधडक सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापराचाही सध्या फज्जा उडत असल्याचे चित्र आहे. कोरोना संक्रमण रोखण्यात मास्क प्रभावी असल्याचे सांगून प्रशासन वारंवार नागरिकांना मास्क वापरण्याबाबत सूचना देत आहे. मात्र, अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून मास्क वापराचा केवळ दिखावा करीत आहेत. नाक, तोंड रिकामे ठेवून मास्क केवळ दिखाव्यासाठी गळ्यात अडकविण्याचे प्रकार सुरू आहेत.
- चौकट
जनजागृतीचाही फरक पडेना
जनजागृती करूनही मास्क वापराबाबत नागरिकांमध्ये म्हणावे तेवढे गांभीर्य येत नसल्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतींसह स्थानिक प्रशासनाला या कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अशी कारवाई करून वसूल केलेला दंड संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जमा करायचा आहे.
- चौकट
... असा आहे दंड
१) मास्कचा वापर न करणाऱ्यास : ५०० रु.
२) सोशल डिस्टन्सिंग उल्लंघन : १००० रु.
३) सार्वजनिक, खासगी जागेत थुंकणे : १००० रु.
४) प्रवासी वाहतुकीचा नियमभंग : १००० रु.