पडक्षेत्रात जनावरे चारण्यास मनाई !

By admin | Published: September 8, 2015 10:04 PM2015-09-08T22:04:17+5:302015-09-08T22:04:17+5:30

कोळेवाडीतील प्रश्न : चाऱ्याअभावी जनावरांचे हाल; शेतकरी हतबल

Not allowed to park animals in the rainy area! | पडक्षेत्रात जनावरे चारण्यास मनाई !

पडक्षेत्रात जनावरे चारण्यास मनाई !

Next

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी-शिंदेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील खाजगी मात्र पूर्वीपासून पाळीव जनावरांसाठी खुल्या असलेल्या डोंगरातील पड क्षेत्रात काही लोकांनी कुळ कायद्याने मालकी हक्क दाखवून पाळीव जनावरांसाठी या क्षेत्रात बंदी घातली आहे. परिणामी मेंढपाळांसह शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने चाऱ्याअभावी जनावरे विकण्याची वेळ आली आहे. कोळेवाडीसह शिंदेवाडी येथे शेतकरऱ्यांसह मेंढपाळांचाही मोठा समावेश आहे. येथील कोरडवाहू शेतजमिनींचे क्षेत्र जास्त आहे. डोंगर पायथ्यालगत वसलेल्या या गावातील पाळीव जनावरेही पूर्वीपासूनच डोंगरातील पड क्षेत्रात चरण्यासाठी सोडली जातात. या क्षेत्रावर शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैशी अवलंबून आहेत. येथील शेतकऱ्यांसह मेढपाळांचा उदरनिर्वाह या जनावरांच्या दुग्ध व्यवसायावर पूर्णत: अवलंबून आहे. पावसाने ओढ दिल्याने चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एक आस्मानी संकट उभे राहिले असताना आता दुसरे सुलतानी संकट उभे राहिले आहे. पूर्वीपासून खुल्या असलेल्या या पड क्षेत्रात काही लोकांनी कुळ कायद्याने आपली नावे लावून मालकी हक्क दाखवत या क्षेत्रात पाळीव जनावरांना बंदी घातली आहे.
यातील एका मालकाने जनावरांपाठीमागे पैसे आकारून जनावरे हिंडविण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र दुसऱ्या मालकांकडून विरोध केला जात असल्याने शेतकरी पूरता संकटात सापडला आहे. याचा सर्वात मोठा फटका मेंढपाळांना बसला आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने शिवारात पिके असल्याने शेळ्या-मेंढ्या सोडता येत नाहीत. झाडांचा पाला उपलब्ध होत नाही. चारा समस्या निर्माण झाल्याने शेळ्या-मेंढ्यांसह गायी-म्हैशी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यातील एक मालक या पडक्षेत्रात जनावरे चारण्यासाठी ४० ते ५० शेळ्या-मेंढ्यांच्या खंडास एक हजार रूपये तर गाय, म्हैशींसाठी प्रत्येकी १०० रूपये आकारत आहे. (वार्ताहर)

पडक्षेत्र खुले होणार का ?
डोंगरातील पड क्षेत्र ज्या मुळ मालकाच्या नावे आहे. त्याच मालकांची अन्य चालू जमीन शिंदेवाडी येथील काही शेतकरी कुळ कायद्याने कसत आहेत. त्यापैकी काही जमीन शेतकऱ्यांनी कुळ कायद्याने आपल्या नावे केली आहे. तर काही जमिन अजून मुळ मालकाच्याच नावे असल्याने पडक्षेत्राबाबत आवाज उठविण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत.

मूळ मालक पुण्यात
कोळेवाडी शिंदेवाडी गावांना लागून असलेले २२५ एकर पडक्षेत्र नावे असलेले मूळ मालक पुणे येथे वास्तव्यास आहेत. मात्र काही स्थानिक लोकांनी कुळ कायद्याचा आधार घेवून हे क्षेत्र स्वत:च्या नावावर करून आपला मालकी हक्क दाखविला आहे. परिणामी मूळ मालकाऐवजी काही कुळ मालकांनी संपूर्ण गावातील जनावरांना या क्षेत्रात चरावयास बंदी घातली आहे.
दहा महिन्यांचा चारा
पूर्वीपासून या पडक्षेत्रात जनावरे सोडली जातात. उपलब्ध चाऱ्यामुळे किमान ८ ते १० महिने जनावरांची भूक भागविली जाते. त्यामुळे कापीव गवत या क्षेत्रामध्ये येत नाही; तर उरलेले गवत काही समाजकंटकांकडून प्रतिवर्षी जाळले जात असल्यामुळे यापासून मूळ मालकांना कसलाच फायदा होत नाही. तरीही जनावरांना बंदी केली आहे.

Web Title: Not allowed to park animals in the rainy area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.