लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांची गय नाही : खरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:46+5:302021-06-26T04:26:46+5:30
तरडगाव : ‘पाडेगाव येथील कोरोना लसीकरणाबाबत कोणतीही शहनिशा न करता पक्षीय राजकारण करून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी प्रांताधिकाऱ्यांना चुकीच्या माहितीवर निवेदन ...
तरडगाव : ‘पाडेगाव येथील कोरोना लसीकरणाबाबत कोणतीही शहनिशा न करता पक्षीय राजकारण करून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी प्रांताधिकाऱ्यांना चुकीच्या माहितीवर निवेदन दिले आहे. संबंधित व्यक्ती गावातील विकासकामांमध्ये आडकाठी आणून वारंवार गावची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे. लसीकरणाबाबत चुकीचा संभ्रम निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,’ असा इशारा सरपंच स्मिता खरात यांनी दिला.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मागील वर्षापासून गाव एकोप्याने कोरोनाचा मुकाबला करीत आहे. याची दखल घेत या काळातील कामाचे कौतुक केले गेले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरण अतिशय पारदर्शी पद्धतीने सुरू असताना चुकीच्या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्ती निव्वळ स्वतःच्या प्रसिद्धीकरिता संपूर्ण गावची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासन निकषांच्या आधारावरच पाडेगाव आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण केले आहे. एकही लस गैरपद्धतीने किंवा चुकीच्या व्यक्तीला दिलेली नाही. याची सर्व माहिती उपलब्ध असताना सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर आरोप करण्यात आलेले आहेत. ते बिनबुडाचे आहेत. अतिशय बेजबाबदारपणे पाडेगावच्या नावाला काळीमा लावण्याचं काम संबंधित व्यक्ती व त्याचे पक्षीय पदाधिकारी करीत आहेत. त्याचा जाहीर निषेध करून सदर गृहस्थाने तातडीने संपूर्ण गावाची माफी मागावी.