कोरोनाची नव्हे; लस संपण्याची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:36+5:302021-04-27T04:40:36+5:30

सातारा: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. मात्र, अधून-मधून लसीचा साठा अपुरा पडत असल्याने नागरिकांना कोरोनाऐवजी आता ...

Not of Corona; Fear of running out of vaccines! | कोरोनाची नव्हे; लस संपण्याची धास्ती!

कोरोनाची नव्हे; लस संपण्याची धास्ती!

Next

सातारा: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. मात्र, अधून-मधून लसीचा साठा अपुरा पडत असल्याने नागरिकांना कोरोनाऐवजी आता लस संपेल, याची धास्ती लागली आहे. त्यामुळे नागरिक लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी करत आहेत. रांगेमध्ये दोन हजारांहून अधिक लोक तब्बल तीन तास उभे राहत आहेत पण ऐनवेळी लस संपल्याचे सांगण्यात आल्यानंतर नागरिक हताश होऊन परताना दिसतात.

राज्य शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर मनुष्यबळ वाढविले आहे का, नेमके कसे नियोजन केले आहे, याचा ‘लोकमत’ने सोमवारी रियालिटी चेक केल्यानंतर प्रशासनाच्या अनेक त्रुटी आणि नागरिकांच्या समस्या समोर आल्या.

लसीकरण केंद्रामध्ये लसीचे डोस केवळ दीड हजार तर बाहेर अडीच हजार लोक रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. ज्यांना लस घ्यायची आहे अशा लोकांकडून जर आधारकार्ड घेऊन त्यांना तसे नंबर लिहून दिले तर त्यांना ताटकळत उभे राहावे लागायचे नाही. मात्र, असे न करता जोपर्यंत लस उपलब्ध आहे. तोपर्यंत नागरिकांना लस दिली जात होती. मात्र, लस अजूनही शिल्लक आहे, असे रांगेमध्ये उभे असलेल्या लोकांना वाटत होते. परंतु नंबर जवळ येताच लस संपली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तब्बल दोन तासांहून अधिक वेळ रांगेत उभे राहूनही लोकांना लस न मिळाल्याने अनेक जणांचा हिरमोड झाला. लसीचा वारंवार तुटवडा होत असल्याने नागरिकांना लस संपेल याची धास्ती लागली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आज घरातून बाहेर आलोय तर लस घेऊनच घरी जाणार, असा ठाम निश्चय अनेकांनी केला होता; परंतु लसच नाही म्हटल्यावर त्यांचाही नाईलाज झाला.

तर दुसरीकडे नागरिकांच्या अनेक समस्या समोर आल्या. घरातून बाहेर पडताना पोलिसांना आम्हाला कारणे द्यावी लागत असल्याचे अनेकांनी सांगितले. ई पास लगेच मिळत नाही. त्यामुळे लसीकरणाला जातानाही ई पास सक्तीचा करू नये, अशी मागणी नागरिक करताहेत. भरउन्हात उभे राहून काहींना भोवळही आली. साताऱ्यातील विसावा नाका परिसरात राहणारे सदाशिव साळुंखे हे ७२ वर्षाचे ग्रस्त सिव्हीलमध्ये लस घेण्यासाठी आले होते. एका तासाहून अधिक वेळ ते रांगेत उभे होते. त्यांच्यासोबत घरातील कोणीही आले नव्हते अचानक त्यांना भोवळ आली. रांगेत उभ्या असलेल्या एका युवकाने त्यांना धीर दिला. स्वतः जवळ असलेले पाणी त्यांना प्यायला दिले. असाच प्रकार राजवाडा परिसरातील लसी केंद्रावरही पाहायला मिळाला. नागरिकांना भरउन्हात उभे राहावे लागत असल्याने लोक आणखीनच अस्वस्थ होत होते.

चौकट : सिव्हीलमध्ये ११ जणांवर मदार

जिल्ह्यामध्ये एकूण ४४६ लसीकरण केंद्रे आहेत. यामध्ये सर्वांत जास्त गर्दीचे केंद्र म्हणून सिव्हील ओळखले जात आहे. या केंद्रावर रोज अडीच ते तीन हजार लोकांची रांग लागल्याचे पाहायला मिळते. या केंद्रांमध्ये ५ डेटा ऑपरेटर, ४ परिचारिका आणि २ डॉक्टर यांच्यावरच या लसी केंद्राची मदार आहे. सकाळी नऊला केंद्र सुरू होते. सायंकाळी सात तर कधी आठ नाहीतर लस संपेपर्यंत रात्री उशिरापर्यंत सुरू राहते.

चौकट :

ना तयारी, ना नोंद!

एक तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप या लसीकरणाची कोणतीही तयारी करण्यात आली नाही. सध्याची गर्दी आवरेना, तर आता १ तारखेनंतर काय होणार, या विवंचनेत आरोग्य विभाग आहे. किती लोकांना लस देण्यात येईल, याची माहितीही प्रशासनाजवळ नाही. वास्तविक सध्या सुरू असलेली लसीकरण मोहीमच अधूनमधून बारगळत आहे. त्यामुळे एक तारखेपासून होणारी लसीकरण मोहीम कशी असेल हे आताच सांगता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चौकट:

मास्क घाला, सांगावं लागत नव्हतं

साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि राजवाडा परिसरातील कस्तुरबा रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू असताना बाहेर रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवले होते तसेच प्रत्येकाने तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे सुरक्षारक्षकांना मास्क लावा हे सांगावं लागत नव्हतं.

कोट : चार दिवसांपासून मी लसीकरणसाठी येत होतो. मात्र प्रत्येकवेळी मला लस संपली आहे, सांगण्यात येत होते. आज सकाळी घरातून लवकर आलो त्यामुळे माझा चौथा नंबर होता. पहिला डोस घेतला आहे. आता बरं वाटतंय

प्रताप मोहिते, शाहूपुरी, सातारा

Web Title: Not of Corona; Fear of running out of vaccines!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.