केंद्र, राज्य सरकारकडून कर्मवीर अण्णांच्या विचारांना फाटा देण्याचे काम - नाना पटोले 

By दीपक देशमुख | Published: May 9, 2023 04:21 PM2023-05-09T16:21:05+5:302023-05-09T16:21:23+5:30

ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांच्याच मुलांना शिक्षणे मिळतील, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे

Not in the Mahavikas Aghadi, but among the people, there were many rumblings against the BJP government says Nana Patole | केंद्र, राज्य सरकारकडून कर्मवीर अण्णांच्या विचारांना फाटा देण्याचे काम - नाना पटोले 

केंद्र, राज्य सरकारकडून कर्मवीर अण्णांच्या विचारांना फाटा देण्याचे काम - नाना पटोले 

googlenewsNext

सातारा : ‘एकनाथ शिंदे यांनी संविधानिक पदाचा उपयोग राज्याच्या हितासाठी करावा. सातारा जिल्ह्याने चार मुख्यमंत्री दिले आहेत. यापूर्वीची तीन मुख्यमंत्र्यांचा सातारी बाणा राखला, पण शिंदे यांचा बाणा कोठे गेला. खारघरच्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्राच्या विचाराला काळिमा फासली आहे, त्यावेळी साताराचा मुलगा मुख्यमंत्री पदावर होता,’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. दरम्यान, कर्मवीर अण्णांच्या विचारांना फाटा देण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सातारा येथील काँग्रेस कमिटीत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी, जिल्हा काँग्रेस निरीक्षक श्रीरंग नाना चव्हाण, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजित देशमुख, राजेंद्र शेलार, महिला अध्यक्ष अल्पना यादव व पदाधिकारी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, ‘कर्मवीर आण्णांनी गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. शाळा ही शिक्षणाची मंदिरे बनवली, पण आता त्यांच्या शिक्षणविषयक विचारांना फाटा देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. बहुजनांच्या मुला-मुलींना शिक्षण मिळू नये, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांच्याच मुलांना शिक्षणे मिळतील, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. 

जनाधार नाकारून ऑपरेशन लोट्स

महाराष्ट्र सीमा भागातील लोकांचा रोष भाजपबाबत जास्त आहे. डबल इंजनचे सरकार द्या, म्हणत मताचा जाेगवा मागितला; पण शासनाने ट्रुबल इंजिनचे सरकार दिले आहे. जनतेने नाकारल्यानंतरही जनाधार नाकारून ऑपरेशन लोट्स करते. जनतेने त्यांना ऑपरेशन वापस करून नॅनो गाडीत बसविल्याचे एक्झिट पोलवरून दिसून येते. कर्नाटकमध्ये बजरंगबली काँग्रेसच्याच बाजूला राहिल.’

महाविकास आघाडीत नाही तर जनतेत भाजप सरकारविरोधात धुसफूस

जागा वाटपाबाबत त्यांना छेडले असता पटोले म्हणाले, येत्या महिनाभरात जागा वाटपासाठी बसणार आहे. जे कोणी भाजपाच्या विरोधात आमच्यासोबत लढायला तयार आहे, त्या लोकांना सोबत घेऊन चालणार आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जागा वाटपाचा प्रश्न सुटेल. महाविकास आघाडीत धुसफूस नाही तर जनतेत भाजप सरकारविरोधात धुसफूस सुरू आहे. मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी व गरिबी वाढत आहे. पहाटेचे सरकारबाबत पटोले मी केलेला आरोप नाही तर ते वास्तव आहे, असेही ते म्हणाले.

बारसूत सरकारी बगलबच्चांच्या जमिनी

बारसू येथे रिफायनरीचा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी जनतेचे मत घेतले पाहिजे. सरकारच्या बगलबच्चांनी तेथे अगोदरच जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्यासाठी हा प्रकल्प उभा केला जात आहे काय? असा सवाल करून उद्योगामुळे तेथील निसर्ग संपविला जाणार असल्याचे संशोधक सांगत आहेत. तरीही विरोध करणाऱ्या महिलांवर लाठीचार्ज केला जात आहे. तेथील जनतेसोबत काँगेस असल्याचे पटोले म्हणाले.

सरकार असूनही आया-बहिणींना वाचवू शकले नाहीत

नॅशनल क्राइम ब्युरोने गुजरातमधील ४० हजार स्त्रीया-मुली बेपत्ता झाल्याबाबत विचारले असता पटोले म्हणाले, सत्तेत बसूनही ते आपल्या आया-बहिणींचे रक्षण करू शकत नाहीत. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती असून, गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे भाजपकडून जनतेने अपेक्षा सोडली आहे. काश्मीर फाइल सिनेमा काढून त्यांनी काश्मिरी पंडितांवर कसा अन्याय होतो ते दाखवले. पण आज सरकार भाजपचेच आहे. आज काश्मीर खाेऱ्यात पंडितांची हत्या होत आहे. काश्मीर फाइल्स लोकांनी पाहिला नाही. यांनीच तिकिटे काढली, असल्याची टीका पटोले यांनी केली.

Web Title: Not in the Mahavikas Aghadi, but among the people, there were many rumblings against the BJP government says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.