या प्रवृत्ती साताऱ्यात नकोत!
By admin | Published: November 2, 2014 10:35 PM2014-11-02T22:35:58+5:302014-11-02T23:29:42+5:30
वेळीच आवर घाला : खंडणीबहाद्दरांच्या वाढत्या उच्छादाविरुद्ध बांधकाम व्यावसायिक एकत्र-बांधकाम क्षेत्राची
सातारा : मंदीसह विविध कारणांनी आधीच अडचणीत आलेल्या बांधकाम व्यवसायावर खंडणीखोरीचे संकट नव्यानेच भिरभिरू लागले आहे. सध्या शहराच्या विशिष्ट भागांमध्येच असलेले हे लोण शहरात पसरायला वेळ लागणार नाही, अशी रास्त भीती या क्षेत्रातील व्यावसायिकांना सतावते आहे. त्यामुळे वेळीच याबाबत विविध समाजघटकांना एकत्र आणण्यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी कंबर कसली आहे.
शहराच्या हद्दवाढीपासून अनेक समस्या बांधकाम व्यावसायिकांचा रस्ता रोखून उभ्या आहेत. नगरपालिका हद्दीत नव्याने जमिनी उपलब्ध नसल्याने शहराच्या परिघावर आणि उपनगरांतच सर्वाधिक बांधकामे सध्या सुरू आहेत. प्रामुख्याने पूर्वेकडील उपनगरांमधून खंडणीखोरीचा उपद्रव सुरू झाला आहे. या प्रवृत्तींना वेळीच आवर घातला नाही, तर साथीच्या आजाराप्रमाणे हे लोण शहरभर पसरण्यास वेळ लागणार नाही, असे बांधकाम व्यावसायिकांना वाटते. ‘लोकमत’ने याविषयी घेतलेल्या परखड भूमिकेबद्दल बांधकाम व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. या विषयावर मंथन करण्यासाठी ‘क्रिडाई’ आणि ‘बिल्डर्स असोसिएशन’ अशा व्यासपीठांवरून व्यावसायिक एकत्र आले. खंडणीखोर केवळ बांधकाम व्यावसायिकांचीच नव्हे तर अनेकांची डोकेदुखी ठरत असल्याने हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स आणि अन्य क्षेत्रांतील बाधितांना संघटित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
खंडणीसाठी धमकावण्याच्या सुमारे पंधरा ते वीस घटना साताऱ्यात आजवर घडल्या असल्या, तरी भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास केवळ तीन ते चार जणच पुढे आले, अशी माहिती व्यावसायिक देतात. याच कारणावरून विजय शिंदे या व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली होती. सैदापूरला पोलीस अधिकाऱ्याच्याच कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना तर अगदी ताजी आहे. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. सातत्याने घडत असलेल्या या घडामोडी साताऱ्यासारख्या शांतताप्रिय शहराला नवीनच आहेत; मात्र खंडणीखोरांचे मनसुबे यशस्वी होऊ लागले, तर हे लोण शहरात इतरत्र पसरायला वेळ लागणार नाही, अशी बिल्डरांना धास्ती वाटते.
मंदीच्या काळात बांधकाम व्यावसायिकांची प्राप्ती बऱ्याच प्रमाणात घटली आहे. रेडी रेकनरइतका दरही बांधकामाला मिळत नाही. सरकारी कार्यालयांमध्ये चिरीमिरीसाठी खर्च करावा लागत असून, हद्दवाढीचा निर्णय खोळंबल्याने जमिनी बिगरशेती करून घेतानाही मोठा खर्च येतो. अशा वेळी खंडणीचे संकट उभे राहिले, तर व्यवसायच अडचणीत येईल; किंबहुना तो तोट्यात जाऊन स्थलांतर करावे लागेल, अशी मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळेच खंडणीच्या संकटाचा मुकाबला ज्यांना-ज्यांना करावा लागतो आहे, अशा सर्व घटकांना आवाहन करून ताकद उभी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)
आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खंडणीसाठी धमक्या, मारहाण, तोडफोड अशा घटना वाढत असल्याने या प्रवृत्ती वेळीच रोखाव्यात, असे निवेदन बांधकाम व्यावसायिक सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत. याच वेळी याप्रश्नी पुढे काय पावले उचलायची, याविषयी दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच, या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन विविध समाजघटकांना करण्यात येणार आहे. .
साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकांना खंडणीखोरांचा वाढता उपद्रव सहन करावा लागत आहे, ही बाब नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याप्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
- रवींद्र पवार,
बांधकाम व्यावसायिक
व्यावसायिकांचे खंडणीखोरांपासून संरक्षण करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. साताऱ्यात ही प्रवृत्ती नव्यानेच दिसू लागली आहे. आधीच अनेक अडचणींनी त्रासलेल्या व्यावसायिकांना आता खंडणीच्या प्रश्नालाही तोंड द्यावे लागणार असेल, तर आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल.
- सलीम कच्छी,
बांधकाम व्यावसायिक