कोयना नदी नव्हे.. सर्व्हिसिंग सेंटर : धुलाईसाठी वाहनांच्या रांगा ,आॅईल, ग्रीसमुळे होतेय जलप्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:20 PM2018-04-20T23:20:48+5:302018-04-20T23:20:48+5:30
पाटण : तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. नदीपात्रामध्येही अत्यल्प पाणी आहे. मात्र,
प्रवीण जाधव।
पाटण : तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. नदीपात्रामध्येही अत्यल्प पाणी आहे. मात्र, त्यातच काहीजण वाहने धूत असल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. काजळी, ग्रीस, आॅईल पाण्यात मिसळल्यामुळे काही ठिकाणी पाण्याचा रंग व चवही बदलली असून, या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.
पाटण तालुक्यात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. पाणी-पाणी म्हणून संपूर्ण जिल्हा टाहो फोडत असतानाच अतिपावसाचा तालुका म्हणून परिचित असलेल्या पाटण तालुक्यालाही टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. तालुक्याला मोठ्या प्रमाणावर डोंगरभाग लाभलेला असतानाही याठिकाणी पाणी टंचाई जाणवते, हे दुर्दैव. तालुक्यातील बहुतांश भाग मार्चपासूनच टंचाईशी लढा देत आहे. तर काही गावे डिसेंबरपासूनच पाण्यासाठी वणवण करीत आहेत. अन्य काही गावांत सध्या तरी टंचाई जाणवत नसली तरी उपलब्ध पाणीसाठा अल्प आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा साठा संपून संबंधित गावांनाही पाण्यासाठी झऱ्याचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोयना नदीकाठावर असूनही अनेक गावांवर सध्या पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. तालुक्यातील अनेक नद्या, विहिरी आटल्या असून, कोयना नदीमधील पाण्याची पातळीही कमी झाली आहे. डोंगरदºयांनी वेढलेल्या आणि धरणांनी व्यापलेल्या तालुक्यात कोयना नदीच अनेक गावांसाठी प्रमुख जलश्रोत आहेत. ही कोयनामाई या तालुक्यातील अनेक वाड्या-वस्तीवरील लोकांची तहान भागवत आहे; पण काही वाहनधारक गावातील जनतेचा विचार करत नाहीत. ते आपली वाहने नदीपात्रामध्ये वाहत्या पाण्यात धुताना दिसत आहेत. पाटण परिसरात सर्रास हे चित्र दिसून येते. दुचाकी, चारचाकी वाहनाबरोबरच ट्रक, टॅव्हल्स, ट्रॅक्टर यासारखी वाहनेही नदीपात्रात बिनधास्तपणे धुवत आहेत.
नदीपात्रात दुचाकी आणि चारचाकी वाहने धुण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे जलप्रदूषण होत असून, हे थांबविण्यासाठी केवळ जनजागृती करून चालणार नाही. प्रत्येक नागरिकाने जलप्रदूषण रोखण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. नगरपंचायतीच्या माध्यमातून लवकरच कोयना नदीपात्रात गाडी धुणाºयांवर चाप लावला जाईल. दंडात्मक कारवाई केली जाईल.
- दीपक शिंदे, उपनगराध्यक्ष, पाटण
राज्यभरात जल शुद्धीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातायत. कोयना नदी ही पाटणसारख्या शहराला निसर्गाने दिलेले वरदान आहे. त्यामुळे या नदीचे पावित्र्य राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नगरपंचायतीने नदीपात्रात वाहने धुण्यास बंदी घातली पाहिजे. तसेच वाहने धुणाºयांना कायद्यानेच जरब बसविली पाहिजे. नदीपात्रात गाडी धुण्यास बंदी ही आता काळाची गरज आहे.
- लक्ष्मण चव्हाण, नागरिक