अभी नहीं... मरने के बाद गाडी भेजेंगे! परप्रांतीयांनी व्यक्त केल्या वेदना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:31 AM2020-05-11T11:31:39+5:302020-05-11T11:39:48+5:30

ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत.

Not now ... will send the car after death! The pain expressed by foreigners ... | अभी नहीं... मरने के बाद गाडी भेजेंगे! परप्रांतीयांनी व्यक्त केल्या वेदना...

अभी नहीं... मरने के बाद गाडी भेजेंगे! परप्रांतीयांनी व्यक्त केल्या वेदना...

googlenewsNext
ठळक मुद्दे*जो लोग मर गये उनके लिए गाडी भेजी... जिंदा लोगों के लिए नहीं

दीपक शिंदे ।
सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे जायचे म्हणून अडकून पडलो आहोत. काम बंद असल्याने हातात पैसा नाही, घरातील साहित्य संपले, भीक तरी कशी मागायची, अशा परिस्थितीत गावाकडे जाण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र घेतले; पण वाहतूक पाससाठी गाडी नंबर मागितला जातो आहे. आमच्याकडे कुठे आहे गाडी. सरकारनेचे गाडीची व्यवस्था केली पाहिजे. पण, ते आता नाही, आम्ही मेल्यानंतर गाडीची व्यवस्था करतील, अशी आर्त वेदना परप्रांतीय नागरिक व्यक्त करत आहेत.

शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये फर्निचरचे काम करणारे, फरशी काम आणि बांधकामावर काम करणारे अनेक परप्रांतीय रोजगार नाही म्हणून घरी बसून आहेत. रोजगार नाही, पैसे नाहीत, घरातील साहित्य संपले. रोज किती दिवस दुसऱ्यांनी दिलेले जेवण करून दिवस काढायचे, असा प्रश्न त्यांना पडतो आहे. ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत.

रेड झोनमध्ये असल्यामुळे आरोग्य प्रमाणपत्र पाहिजे, यासाठी आम्ही दिवसभर रांगेत उभे राहून आरोग्य प्रमाणपत्र मिळविले. त्याच्यानंतर आता आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी सांगितला जात आहे. कामगार, अशिक्षित लोक कसा फॉर्म भरणार. त्यासाठी सरकारने व्यवस्था केली; पण त्या केंद्रावर गेल्यावर अर्ज भरताना गाडी नंबर मागितला जात आहे. ज्यांच्याकडे दुचाकी नाही ते चारचाकी गाडी कोठून आणणार. गावापर्यंत जायला आणि गाडीवाल्याला देण्यासाठी पैसे तरी पाहिजेत. त्यामुळे सरकारने सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था करण्याची गरज आहे.

पण सार्वजनिक वाहन व्यवस्था उपलब्ध नाही, असे सांगून वाहतूक परवानाच मिळत नाही. त्यामुळे कसे जाणार गावाला. जगलो, वाचलो तर परत येऊ. पण जगलोच नाही तर काय करणार. अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागते.


अजून दोन दिवस वाट पाहणार...
गावाकडे जाण्यासाठी काय व्यवस्था होते का? याबाबत अजून दोन दिवस सर्व परप्रांतीय वाट पाहणार आहेत. त्यानंतर जर कोणतीच व्यवस्था झाली नाही तर मग पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत अनेकजण पायी गेले, भेटेल त्या गाडीने गेले. त्यामुळे आम्हीही तोच निर्णय घेण्याच्या मानसिक अवस्थेत आलो आहे.


*जो लोग मर गये उनके लिए गाडी भेजी... जिंदा लोगों के लिए नहीं
औरंगाबादजवळील अपघाताचा आठवण करून देताना एक परप्रांतीय सांगू लागला. लोक जिवंत असताना त्यांना कोणीच विचारत नाहीत. मात्र, मेल्यानंतर गाडी पाठवितात. हीच व्यवस्था अगोदर केली असती तर एवढ्या लोकांना आपला जीव गमवावा लागला नसता.

Web Title: Not now ... will send the car after death! The pain expressed by foreigners ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.