'साताऱ्यातून शरद पवारांना बिनविरोध करा अन् उदयनराजेंना राज्यसभेवर घ्या, सर्व प्रश्न मिटतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 12:20 PM2019-09-25T12:20:07+5:302019-09-25T12:20:55+5:30
शरद पवारांसोबत उदयनराजेंनी कायम राहावं ही आमची तळमळ होती
सातारा - लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता साताऱ्यात उमेदवारीवरुन चर्चा सुरु आहे. या दरम्यान उदयनराजे भोसले यांनी भावूक होत जर शरद पवार निवडणुकीत उभे राहणार असतील तर उमेदवारी अर्ज भरणार नाही असं विधान केलं त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाष्य केलं आहे. उदयनराजेंना असं वाटत असेल तर शरद पवारांना बिनविरोध करा अन् उदयनराजेंना राज्यसभेवर घ्यावं असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले की, शरद पवारांसोबत उदयनराजेंनी कायम राहावं ही आमची तळमळ होती, पण दुर्दैवाने भाजपाने जी खेळी केली त्या परिस्थितीतून उदयनराजेंवर तणाव होता त्यातून भाजपात प्रवेश केला असावा, भाजपा सरकारविरोधात जनतेने शरद पवारांना दिलेला पाठिंबा पाहून एक नवीन आत्मविश्वास तयार झाला. ज्येष्ठापासून तरुणांपर्यंत स्वयंस्फुर्तीने साताऱ्यातील मेळाव्यात आले होते असं त्यांनी सांगितले.
तसेच सातारा उमेदवारीबाबत अद्याप पक्षाचा कोणताही निर्णय नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह केला तरी शरद पवारच निर्णय घेतील. बिनविरोध होणार असेल तर शरद पवारांना उमेदवारीसाठी आग्रह धरू. प्रेम, आपुलकीपणा, आदर उदयनराजेंना दिला. भाजपाने उदयनराजेंना राज्यसभेवर घ्यावं, मंत्रिपदाचं आश्वासन दिलं ते पूर्ण करावं मग सर्व प्रश्च मिटतील असा टोला शशिकांत शिंदे यांनी भाजपाला लगावला आहे.
मंगळवारी पत्रकारांशी शरद पवारांबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले होते, त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ते आदरणीय कालपण होते, आजपण आहेत, भविष्यातपण राहतील. आज महाळ आहेत, असे म्हणत पूर्वजांची आठवण उदयनराजेंनी काढली. त्यावेळी, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्यांच्यनंतर तेच माझ्यासाठी आहेत. शरद पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा असल्याचं विचारताच, ते उभे राहणार असल्यास मी फॉर्म भरणार नाही, असं उदयनराजेंनी जाहीर केलं. पण, दिल्लीतील बंगला आणि गाडी यासाठी मला मुभा द्यावी, असे म्हणत पवारांचं प्रेम मिळावं ही अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली.