मधमाशांनी आमच्यावर नव्हे आम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय : सयाजी शिंदे
By दीपक शिंदे | Published: March 15, 2023 01:01 PM2023-03-15T13:01:59+5:302023-03-15T13:03:31+5:30
झाड पाडल्यावर पाच जन्म तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरणात झाडांची कत्तल सुरू आहे. हे पाहून मन कासावीस होते. हातातील सर्व शूटिंगची कामे सोडून ही झाडे वाचविण्यासाठी आलो आहे. जे झाड दोनशे वर्षांपासून किडा, मुंगी, पक्षी यांना आसरा आणि माणसांना ऑक्सिजन देते. ते झाड पाडल्यावर ५ हजारांचा दंड केला जातो. हे लाजिरवाणे असून असे झाड पाडल्यावर पाच जन्म तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे, असे मत अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
सयाजी शिंदे म्हणाले, जो माणूस इतर माणसांसाठी किंवा पर्यावरणासाठी काहीही न करता फक्त राजकारण करतो. पाच वर्षे सरपंच असतो. त्याच्या मृत्यूनंतर शेकडो लोक शोक करतात. पण, दोनशे वर्षे जे झाड केवळ इतरांसाठी काम करते. फळे, फुले आणि ऑक्सिजन देते. त्या झाडांना मारले जात असताना कोणालाच कसे काही वाटत नाही. पाच वर्षांच्या राजकारणात इकडचे काम तिकडे करणाऱ्यांना आपण खूप चांगले काम केल्याचे म्हणतो. पण, झाडांनी निरपेक्ष वृत्तीने मनुष्य आणि पशू-पक्ष्यांची केवळ सेवाच केलेली असते. याचा विचार करायला कोणालाच वेळ नाही.
ते पुढे म्हणाले, आपल्या घराची भिंत एखाद्याने पाडली तर आपण त्याला कोर्टात खेचतो. एवढी सजगता झाडांच्या बाबतीत दाखवत नाही. पुढारी, सेलिब्रिटी यांच्या मागे धावतो. ते आपल्यासाठी काही करत नाहीत, पण त्यांच्यासाठी जीव देण्याची तयारी करतो. मग जी झाडे आपल्याला कायम ऑक्सिजन देऊन जीव वाचवितात त्यांच्यासाठी काय करतो, असा सवालही सयाजी शिंदे यांनी केला.
महामार्गावरील जुनी ३५ झाडे वाचविणार
झाडे केवळ कागदोपत्री वाचवून चालणार नाही, तर त्यांचे पुनर्रोपण करणे आवश्यक आहे. महामार्गावरील ३५ जुन्या झाडांचे जवळपास रोपण करण्यात येणार असून शक्य तेवढी झाडे वाचविण्याचा निर्णय सयाजी शिंदे यांनी घेतला आहे.
मधमाशांनी आमच्यावर नव्हे आम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय
महामार्गावरील झाडे वाचविण्यासाठी आलेलो असताना ही झाडे पाडण्यात आली. त्यावर काही मधमाशांची पोळी होती. त्यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर त्या प्रतिकार करणे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यावर हल्ला केलेला नाही तर आम्ही त्यांच्या घरावर हल्ला केल्यामुळे त्यांनी केवळ बचावात्मक पवित्रा घेतला आहे.