तिसऱ्या नव्हे, दुसऱ्या लाटेतच चिमुकल्यांना कोरोनाचा विळखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:41 AM2021-05-08T04:41:01+5:302021-05-08T04:41:01+5:30
कऱ्हाड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बालकांना जास्त धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, दुसऱ्या लाटेतही शेकडो मुलांना कोरोनाची ...
कऱ्हाड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बालकांना जास्त धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, दुसऱ्या लाटेतही शेकडो मुलांना कोरोनाची बाधा झाली असून एकट्या कऱ्हाड तालुक्यात एप्रिल महिन्यामध्ये दोन हजारावर बालके कोरोनाबाधित झाली आहेत. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांमध्येही अनेक मुलांचा समावेश असून पालक चिंतेत आहेत.
गतवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव केला. तेव्हापासून आजअखेर संसर्ग थांबलेला नाही. डिसेंबर, जानेवारी महिन्यात संसर्गाचा वेग काहीअंशी मंदावला. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे, तर तिसरी लाट याहून गंभीर असू शकते, असा इशारा दिला जातोय. तिसऱ्या लाटेत बालकांना जास्त धोका असून ० ते १० वयोगटातील मुलांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. दुसऱ्या लाटेला तोंड देत असतानाच तिसऱ्या लाटेच्या भीतीने सर्वांचीच झोप उडाली आहे.
बालकांना जास्त धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असल्यामुळे पालक आतापासूनच काळजीत पडले आहेत. आपल्या मुलाला कोरोनापासून कसे दूर ठेवता येईल, हा विचार प्रत्येक पालक करीत असून काही पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासही सुरुवात केली आहे. मात्र, सध्या दुसऱ्या लाटेतही मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढले असून कऱ्हाड तालुक्यात एक महिन्यामध्ये दोन हजारावर मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.
- चौकट
एप्रिलमध्ये २०४६ मुलांना कोरोना
कऱ्हाड तालुक्यात मार्च २०२० पासून एप्रिल २०२१ अखेर ० ते १० वर्षे वयोगटातील एकूण २ हजार ४५९ बालकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी मार्च २०२० ते मार्च २०२१ अखेर कोरोनाबाधित बालकांची संख्या केवळ ४१३ एवढी होती, तर एप्रिल २०२१ या एका महिन्यात नव्याने २ हजार ४६ बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
- चौकट
वयानुसार बाधितांची संख्या...
वय : बाधित
० ते १ : २३४
१ ते १० : २२२५
११ ते ४० : ६४७०
४१ ते ६० : ४६२०
६१ ते ८० : २०८६
८० च्या पुढे : १७८
एकूण : १५८१३
- चौकट
१३७९ मुले; १०८० मुली बाधित
वय : पुरुष : महिला
० ते १ : १३३ : १०१
१ ते १० : १२४६ : ९७९
- चौकट
एकूण बाधितांपैकी...
पुरुष : ५८.५६ टक्के
महिला : ४१.४४ टक्के
- चौकट
सरासरी
बालके : १५.५५ टक्के
तरुण : ४०.९२ टक्के
ज्येष्ठ : २९.२२ टक्के
वृद्ध : १४.३२ टक्के
- चौकट
९० गर्भवतींनाही बाधा
कऱ्हाड तालुक्यात आजअखेर एकूण ९० गर्भवतींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी २ गर्भवती महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.