Satara: रस्त्याची ‘वाट’; सार्वजनिक बांधकामची तिघा ठेकेदारांना नोटीस
By नितीन काळेल | Published: August 6, 2024 07:17 PM2024-08-06T19:17:48+5:302024-08-06T19:18:23+5:30
रस्ते दुरुस्तीबाबत फतवा : पालकमंत्रीही आक्रमक
सातारा : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक रस्त्यांची वाट लागलेली आहे. पावसाळ्यापूर्वी झालेल्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात घडत आहेत. त्यातच रस्त्यांबाबत पालकमंत्रीही आक्रमक झाले आहेत. यामुळे संबंधित यंत्रणाही कामाला लागली आहे. तसेच आता सार्वजनिक बांधकाम विभागानेही तिघां ठेकेदारांना नोटीस काढून रस्ते दुरुस्तीबाबत फतवा काढला आहे. त्यामुळे आतातरी रस्ता कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी नागिरकांतून होत आहे.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊस पडत आहे. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. पण, पश्चिमेकडे धो-धो पाऊस झाला. यामुळे अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. खड्ड्यांचे रस्ते झालेले आहेत. तसेच काही मार्गावर तर खोल आणि रुंद मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यावरुनच वाहने जात असल्याने अपघात घडू लागले आहेत. यामुळे बांधकाम विभागाबद्दल सर्वस्तरातून नाराजी व्यक्त होत होती. यामध्येच विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांची कामे उरकण्यात आली. हे रस्तेही पावसात वाहून गेले आहेत. रस्त्याच्या मधोमध चरी पडल्यात. त्यामुळे दुचाकीसारखी वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागते.
तर सातारा शहरातील समर्थ मंदिर-सज्जनगड रस्त्याचीही वाट लागलेली आहे. यासाठी उध्दवसेनेने सोमवारी आंदाेलन केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा झाला. या रस्त्याची पूर्ण दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आलेले आहे. पण, हे एका रस्त्याचे झाले. इतर रस्त्यांबद्दलही बांधकाम विभागाने दखल घेण्याची गरज आहे. तरच वाहतुकीस चांगले रस्ते तयार होतील.
सातारा तालुक्यात २, महाबळेश्वरला एकाला नोटीस..
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन विभाग आहेत. पश्चिम विभागात कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, जावळी आणि वाई हे तालुके येतात. तर पूर्व विभागात माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव, सातारा असे सहा तालुके समाविष्ट आहेत. पावसाळ्यात रस्त्याची वाट लागल्यानंतर बांधकाम विभागाने महाबळेश्वर तालुक्यातील एका ठेकेदाराला नोटीस काढली आहे. संबंधिताला तत्परतेने काम केलेल्या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सांगितले आहे. तर सातारा तालुक्यातीलही दोन ठेकेदारांना रस्त्याबद्दल नोटीस काढण्यात आलेली आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली असल्याने जे-जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारक तसेच जिल्ह्यातील नागरिकांतून होत आहे.
पालकमंत्र्यांकडे नागरिकांची मागणी..
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी जिल्हाधकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग चारवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने १५ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवावेत, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली आहे. तसेच खड्डे बुजविले नाहीत तर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिलेला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आता जिल्ह्यातील इतर रस्त्यांबाबतही आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.