कऱ्हाडमध्ये शिवशंकर पतसंस्थेच्या ४३ आजी-माजी संचालकांना नोटिसा, लेखी खुलासा देण्याची सूचना
By प्रमोद सुकरे | Published: November 8, 2023 05:01 PM2023-11-08T17:01:16+5:302023-11-08T17:01:41+5:30
प्रमोद सुकरे कऱ्हाड : कऱ्हाड येथील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था अडचणीत आल्यानंतर त्याचे लेखापरीक्षण सुरू आहे. सन २००० पासून ...
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : कऱ्हाड येथील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था अडचणीत आल्यानंतर त्याचे लेखापरीक्षण सुरू आहे. सन २००० पासून म्हणजे गत २३ वर्षांचे नव्याने लेखापरीक्षण करण्याचे काम होत आहे. दरम्यान, विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी संस्थेच्या सन २००२ पासूनच्या ४३ आजी- माजी संचालकांसह ९ कर्मचारी व ७ ऑडिटर यांना खुलासा देण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर या सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
धनंजय गाडे यांनी २ नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, शिवशंकर पतसंस्थेमध्ये अपहार झाल्याची तक्रार झाल्यानंतर विशेष लेखापरीक्षक म्हणून मी परीक्षण करीत आहे. त्यात अपहार व आर्थिक नुकसानीच्या बाबी निदर्शनास आल्याने त्यासंदर्भात आपला खुलासा घेणे आवश्यक आहे. म्हणून ही नोटीस पाठवीत आहे.
संस्थेमधील अनेक कर्जे ही विनातारणी दिसत आहेत. तसेच अपूर्ण कागदपत्रे पाहायला मिळत आहेत. ठेवीदार हितास बाधा आणणारा कारभार व ठेवीदार सभासदांचा विश्वासघात व फसवणूक करणारा कारभार संस्थेत झाल्याचे निदर्शनास येत आहे.
स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता संस्थेचे आर्थिक नुकसान करून संगनमताने अपहार केल्याचेही दिसून येत आहे. संस्था हिशेबाच्या नोंदवहीत खोट्या नोंदीही दिसत आहेत. वरील अनेक मुद्द्यांसाठी, अपहार रकमेबाबत नुकसानीस आपणास जबाबदार का धरू नये? याचा लेखी खुलासा आपणाकडून येणे आवश्यक आहे. आपल्याला नोटीस मिळाल्यानंतर १४ दिवसांच्या आत आपण आपला खुलासा पुराव्यासहित आमच्याकडे द्यावा. तो दिला नाही तर आपणास हे मान्य आहे, असे गृहीत धरून किंवा दिलेला खुलासा समाधानकारक वाटला नाही तरी आपणावरती पुढील कारवाई करण्यात येईल, असेही यात म्हटले आहे.
खुलाशाकडे ठेवीदारांचे लक्ष
सदरच्या नोटिसा मिळाल्यानंतर संबंधित संचालक, कर्मचारी व त्या-त्या वर्षी लेखापरीक्षण केलेले ऑडिटर यांचे धाबे दणाणले आहेत. ते आता काय खुलासे देणार, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागून राहिले आहे.