कट्टे वाटपाला आता तरी मुहूर्त काढा!--निवडणूक झाली, आता कामाचं बोला
By admin | Published: October 22, 2014 09:39 PM2014-10-22T21:39:43+5:302014-10-23T00:10:52+5:30
राजवाडा मंडई : दोन्ही आघाड्यांच्या लपंडावात विक्रेत्यांची गोची
सातारा : पालिकेने शहरात उभारलेल्या टोलेजंग भाजी मंडई व फ्रूट मार्केटचे निवडणुकीआधी थाटात उद्घाटन झाले; परंतु अजूनही विक्रेत्यांना जागा वाटप झालेले नाही. दोन्ही आघाड्यांचा मेळ बसत नसल्याने मंडईतील कट्टे वाटपाचे घोडे अडले आहे.
शहरात फूटपाथवर बसून भाजी तसेच फळ विक्री करणाऱ्यांची सोय व्हावी, तसेच शहरातील फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे व्हावेत. रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी, या हेतूने तत्कालीन नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांच्या संकल्पनेतून राजवाडा येथे प्रतापसिंह महाराज फ्रूट मार्केट व भाजी मंडईची उभारणी करण्यात आली. या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी तब्बल दोन कोटी खर्च झाले आहे. तळात प्रशस्त पार्किंग त्यावरच्या मजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी कट्टे व दुसऱ्या मजल्यावर फ्रूट मार्केट अशी रचना या इमारतीत आहे.
दरम्यान, एवढा निधी खर्च करून उभारलेल्या या इमारतीचे सुमारे चार महिन्यांपूर्वी उद्घाटनही झाले. मात्र, अजूनही या मंडईचा वापर होताना दिसत नाही. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कट्टे वाटपाबाबत एकमत होत नसल्याचे कारण पुढे येत आहे. या मंडईत पूर्वी बसणाऱ्या विक्रेत्यांची नावे पालिकेकडे नोंदली गेली आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी जवळच्या लोकांची सोय मंडईत करावी, यासाठी पालिकेतील एक गट आग्रही असल्याने हा विषय रखडला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या मंडईतील कट्टे वाटपाचा ड्रॉ घेतला नाही. आता विधानसभा निवडणूक पार पडली आहे. आता ड्रॉ काढायला कोणती अडचण राहिलेली नाही, तरीही दिरंगाई सुरू आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या इमारतीत भाजी मंडईमध्ये १२३ कट्टे आहेत, तर फळविक्रीसाठी ४८ कट्टे आहेत. यापैकी ४८ विक्रेते पादचारी मार्गावरच फळविक्री करतात. त्यांचे या फ्रूटमार्केटमध्ये स्थलांतर झाल्यास फूटपाथ मोकळे होऊन नागरिकांची रस्त्याने चालण्याची सोय होईल. मात्र, पालिकेच्या दिरंगाईमुळे अनेक महिने हा विषय भिजत पडला आहे. (प्रतिनिधी)