आता महिनाभर परीक्षेचं ओझं..!
By admin | Published: February 21, 2015 11:23 PM2015-02-21T23:23:36+5:302015-02-21T23:46:51+5:30
बारावीची परीक्षा सुरू : जिल्ह्यात ४२ केंद्रे ; यावर्षीपासून दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका
सातारा : शालेय जीवनातील दहावी आणि बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण असते. बारावीनंतर पुढे काय करायचे ते ठरविले जाते. अशा महत्त्वपूर्ण असणाऱ्या बारावीच्या वार्षिक परीक्षेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार विद्यार्थी ४२ केंद्रांतून ही परीक्षा देत आहेत. तर यावर्षीपासून प्रथमच विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. दरम्यान, ही परीक्षा दि. २६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर असणार आहे.
शालेय जीवनात दहावी आणि बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. या दोन्हीही परीक्षा बोर्डामार्फत घेण्यात येतात. या परीक्षेतील यशावरच पुढील शिक्षण अवलंबून असते. विशेष करून बारावीला अधिक महत्त्व आहे. बारावीनंतर डीएड करायचे की कॉलेज, का इंजिनिअरिंग, मेडिकलला जायचे हे गुण आणि इच्छेनुसार ठरविले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर असतं तसेच पालकांनाही त्याची काळजी असते.
शनिवारपासून राज्यभरात बारावीची वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार परीक्षार्थी आहेत. विविध ४२ केंद्रांतून ते परीक्षा देत आहेत. ही परीक्षा सुमारे एक महिना चालणार आहे. दि. २६ मार्चला बारावीचा शेवटचा पेपर असणार आहे. जिल्ह्यातील बारावीची परीक्षा सुरळीत व्हावी, यासाठी सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक, प्राथमिक, निरंतर शिक्षण विभाग तसेच महिलांचेही एक विशेष भरारी पथक असणार आहे.
यावर्षी प्रथमच परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. कारण, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे आकलन व्हावे, प्रश्न समजून घेता यावेत, हा उद्देश आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणची वीज गेल्यास जनरेटरची सोयही करण्यात आलेली आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)