मोकळ्या शिवारात आता मेंढ्यांची गर्दी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:39+5:302021-03-15T04:34:39+5:30
खटाव : ग्रामीण भागात सध्या शेतातील सुगी संपून शेतकरी आता थोडा निवांत झाला आहे, तर मोकळ्या झालेल्या शेतात मेंढरे ...
खटाव : ग्रामीण भागात सध्या शेतातील सुगी संपून शेतकरी आता थोडा निवांत झाला आहे, तर मोकळ्या झालेल्या शेतात मेंढरे बसवून शेतकरी शेतीस पूरक व उपयुक्त खत कसे उपलब्ध होईल, याच्या गडबडीत आहे.
शेळी, मेंढीपालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किफायतशीर व उपयुक्त ठरलेला आहे.
खटावमध्ये गावातल्या गावात सध्या असे मेंढपाळ लोकांना शेतकऱ्यांकडून बोलावून घेऊन शेतात मेंढ्या बसवण्याकरिता त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बसवून घेतले जात आहे.
खटावमध्ये सुनील पाटोळे, संपत पाटोळे, आबा पाटोळे, पोपट चव्हाण, विठ्ठल बुधावले या पाच जणांच्या मिळून एकूण ४०० मेंढ्या आहेत. यामध्ये २० शेळ्यादेखील आहेत. सुगी संपल्यानंतर ज्या शेतात मेंढरे बसवायची आहेत. त्या शेतकऱ्यांकडून जेवढे क्षेत्र असेल त्यानुसार एका रात्रीला ३५ किलो बाजरी याप्रमाणे किती रात्री मेंढ्या बसवायचे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून या मेंढपाळ लोकांना दिले जाते.
हा व्यवसाय अत्यंत कष्टमय असून, हे मेंढपाळ ऊन, वारा, पाऊस, याचा विचार न करता तसेच सर्व सोयी न उपभोगता दिवस-रात्र मेंढ्यांच्या कळपात राहून हा व्यवसाय करतात. नेटच्या जाळीत बंदिस्त करूनही साथीच्या आजाराबरोबरच रात्रीच्या वेळी जंगली श्वापदे, कुत्री यांचीदेखील भीती असतेच. या सर्वांवर मात करत मेंढपाळ हा शेती पूरक व्यवसाय करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
वार्षिक दीड-दोन लाख उत्पन्न मिळत असले तरी कळपात मरझड ही होतच असते, तो तोटा सहन करावा लागतो. तसेच याकरिता संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसह रानोमाळ तसेच शिवारात भटकावे लागते.
(कोट)
मेंढ्या जास्त असल्यामुळे आजारी पडल्या तर आम्ही सुरुवातीला डॉक्टर बोलावत होतो. परंतु जास्त मेंढ्या असल्यामुळे प्रत्येकवेळी डॉक्टर परवडत नाही. त्यामुळे स्वतःच डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार इंजेक्शन व औषध उपचार करण्याचे काम करतो. शेतात मेंढरे बसवण्याकरिता एका रात्रीसाठी ३५ किलो बाजरी किंवा ज्वारी शेतकऱ्याकडून घेतली जाते.
- संपत पाटोळे, मेंढपाळ खटाव
१४खटाव
कॅप्शन : सुगी संपल्यामुळे आता शेतात पारंपरिक पद्धतीने लेंडी खताकरिता शेळ्या व मेंढ्या बसवण्यास प्रारंभ झाला आहे.