...आता कऱ्हाडचे स्वच्छ सर्वेक्षणही वादाच्या भोवऱ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:36 AM2021-03-25T04:36:53+5:302021-03-25T04:36:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : कऱ्हाड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग तीन वर्षे देशात प्रथम क्रमांक मिळवून हॅट्ट्रीक साधली ...

... Now even a clean survey of Karhad is in the midst of controversy! | ...आता कऱ्हाडचे स्वच्छ सर्वेक्षणही वादाच्या भोवऱ्यात !

...आता कऱ्हाडचे स्वच्छ सर्वेक्षणही वादाच्या भोवऱ्यात !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : कऱ्हाड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग तीन वर्षे देशात प्रथम क्रमांक मिळवून हॅट्ट्रीक साधली आहे. त्यात सातत्य राखण्यासाठी यावर्षीही काम सुरू आहे. अशातच येथील भाजपच्या नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षण कामाच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने आता कऱ्हाडचे स्वच्छ सर्वेक्षणही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

येथील पालिकेच्या कारभारात गेल्या काही महिन्यांपासून गोंधळात गोंधळ सुरू आहे. सत्ता संपत आली तरी नेमके सत्ताधारी कोण, हे नागरिकांनाही कळेना. भाजपच्या नगराध्यक्षा आणि जनशक्ती आघाडीचे बहुमत यामुळे सत्तेचे त्रांगडे कऱ्हाड शहर गेली चार वर्षे अनुभवत आहे. त्याचाच परिपाक म्हणून नगरसेवकांमधील धुसफूस सारखी चव्हाट्यावर येत आहे.

काही दिवसांपूर्वी पालिकेच्या अर्थसंकल्पाची विशेष सभा झाली. त्यात सत्ताधारी कोण, या मुद्द्यावरूनच भाजप व जनशक्ती आघाडीत ‘तू तू मै मै’ झाले. अर्थसंकल्प मंजूर करण्यावरुन गदारोळ झाला. सूचना की उपसूचना मंजूर करायची यावरून दोन स्वतंत्र अर्थसंकल्प जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी पडून आहेत. आता त्याला मंजुरी कधी मिळणार आणि विकासकामे कधी मार्गी लागणार, हे कळायला मार्ग नाही.

दरम्यानच्या काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या; अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले गेले. या आरोपांची शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेच. आता या सगळ्या घडामोडीत भाजपच्या नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षण कामाच्या चौकशीच्या केलेल्या मागणीने भर पडली आहे एवढेच!

कऱ्हाड पालिकेच्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध कामांमध्ये व त्याची बिले देण्यात अनियमितता आहे. त्याबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे गत तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत झालेल्या विविध कामांची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नुकतीच भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर विनायक पावसकर, सुहास जगताप, विद्या पावसकर, अंजली कुंभार यांच्या सह्या आहेत. त्यामुळे कऱ्हाड पालिकेत आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

केंद्र सरकारने राबवलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कऱ्हाड पालिकेने २०१८ साली प्रथम सहभाग घेतला. देशात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर सलग दोन वर्ष या अभियानात सहभाग घेऊन आपले स्थान कायम ठेवले. यावर्षी यशाचा चौकार मारण्यासाठी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी, प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र, अशातच पडलेला हा चौकशीचा बॉम्ब नक्कीच धक्कादायक आहे.

चौकट :

उपनगराध्यक्षही करणार होते चौकशीची मागणी

विद्यमान उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी पालिकेच्या कचरा डेपोच्या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले होते. त्याचे पुढे काय झाले, हे मात्र माहीत नाही.

चौकट

तक्रारही भाजपची...

पालिकेत रोहिणी शिंदे या नगराध्यक्षा आहेत. त्या भाजपच्या माध्यमातून थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. पण पालिकेत बहुमत जनशक्ती आघाडीचेे आहे. त्यामुळे नगराध्यक्षा भाजपच्या अन् तक्रारही भाजप नगरसेवकांची अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

फोटो :

कऱ्हाड पालिकेचा संग्रहित फोटो

Web Title: ... Now even a clean survey of Karhad is in the midst of controversy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.