आमदारांच्या बालेकिल्ल्यातच आता अटीतटीची लढत
By admin | Published: August 2, 2015 10:03 PM2015-08-02T22:03:22+5:302015-08-02T22:03:22+5:30
पाटण : कोकिसरे, गोकुळ तर्फ पाटण, वाडीकोतावडेकडे लक्ष
अरुण पवार- पाटण -आमदार शंभूराज देसार्इंना मोठे मताधिक्य देणारा हुकमी गट म्हणजे मोरणा परिसर. याच परिसरातील कोकिसरे, गोकुळ तर्फ पाटण, वाडीकोतावडे आणि पेठशिवापूर ग्रामपंचायतींमध्ये पाटणकर गटाने मोठे आव्हान दिल्यामुळे कडव्या लढती होण्याची शक्यता आहे.पाटण तालुक्यातील मोरणा परिसरातील धावडे, आटोली, आडदेव या ग्रामपंचायती बिनविरोध होऊन त्या निर्विवादपणे देसाई गटाकडे गेल्या. आता वेळ आली आहे ती वरील चार ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात राहणार याची. कोकिसरे येथे ९ जागांसाठी निवडणूक होत असून, दोन जागांसाठी देसाई गटात बंडखोरी झाल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. तरीसुद्धा देसाई गटाचे पारडे जड आहे. गोकुळ तर्फ पाटणला मात्र पवनचक्कीचा रागरोष उफाळून आला असून, देसाई गटाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पेठशिवापूर ग्रामपंचायतीत नेहमीप्रमाणे परंपरा म्हणून निवडणूक होत आहे. काहीरमध्ये बिनविरोधची परंपरा खंडित झाली आहे. पाचगणी ही ग्रामपंचायत देसाई गटाकडे बिनविरोध झाली असली तरी एका जागेसाठी अंशत: मतदान होणार आहे.
आटोलीत देसाई गटाने दबदबा कायम राखून चार विरुद्ध तीन असा समझोता करून निवडणूक बिनविरोध केली. आमदार शंभूराज देसार्इंचे जिव्हाळ्याचे गाव म्हणून धावडे ग्रामपंचायत ओळखली जाते. याठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे.
नेत्यांनीही केले दुर्लक्ष
विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर पाटणकर गटाला मरगळ आल्याचे चित्र आहे. त्यातच नेत्यांनी सुद्धा लक्ष काढल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या निकालमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.