आता ६७ पैसेवारीच्या गावांचाही समावेश
By admin | Published: September 17, 2015 10:50 PM2015-09-17T22:50:50+5:302015-09-17T22:52:24+5:30
दुष्काळ : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरलाही लाभ
घोटी : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागाचे निकष लावताना पैसेवारीच्या टक्केवारीत सुधारणा केली असून, शासनाच्या नवीन धोरणानुसार इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पर्जन्यमान कमी झाले असल्याने नवीन निकषाच्या पैसेवारीत ंहे तालुके बसत असल्याने या दोन्ही तालुक्यात दुष्काळग्रस्तांचे लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली.
पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यात पावसाने दगा दिल्याने दुष्काळसदृश स्थिती
निर्माण झाली आहे. मात्र असे असताना शासनाच्या दि. ४ मार्च १९८९च्या ठरावानुसार मागील दहा वर्षाच्या कालावधीत तीन उत्तम उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाच्या विविध सोयी सवलती देण्यात येत होत्या.
अखेर शासनाने या मागणीची दखल घेत व परिस्थितीचे अवलोकन करून आपल्या निर्णयात सुधारणा केली असून, त्याबाबतचे नवीन परिपत्रक जारी केले आहे. यानुसार मागील पाच वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्काळग्रस्त जाहीर करून त्यांना सोयी सवलती लागू करण्यात येणार आहे. तसे आदेश शासनाच्या महसूल विभागाने राज्यातील कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर आदि विभागाच्या विभागीय आयुक्ताना दिले आहेत.
या नवीन निकषात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका बसत असल्याने आता या दोन्ही तालुक्याला त्याचा लाभ मिळणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (वार्ताहर)