आता उंडाळकरांना ‘नारळ’ द्या भाई जगतापांचा कऱ्हाडात टोला
By admin | Published: October 7, 2014 10:36 PM2014-10-07T22:36:29+5:302014-10-07T23:41:43+5:30
काँग्रेसमुळेच काका ३५ वर्षे आमदार; तरीही शेवटच्या क्षणी गद्दारी
कऱ्हाड : आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना काँग्रेसच्या तिरंग्यामुळेच ३५ वर्षे आमदार होण्याचा सन्मान मिळाला़ पक्षाने त्यांना भरभरून दिले; पण त्यांनी या निवडणुकीत गद्दारी केली़ त्यामुळे त्यांना आता कायमचा ‘नारळ’ द्या, त्यांना घरीच बसवा,’ असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप यांनी लगावला़ कऱ्हाड येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते़ अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, अरुण जाधव, फारुक पटवेकर, नगरसेविका स्मिता हुलवान, सुरेखा पालकर, अरुणा शिंदे, श्रीकांत मुळे, बाळासाहेब यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती़ भाई जगताप म्हणाले, ‘अच्छे दिन’च्या नावाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत लोकांना फसवलं; पण आता विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता त्यांच्या फसव्या जाहिरातींना भुलणार नाही़ आज काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याच्या वल्गना काहीजण करीत आहेत़ पण, त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना भारत काँग्रेसमुक्त करता आला नाही़ मग तुम्ही काय महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करणार, उलट महाराष्ट्र कमळाबाई मुक्त झाल्याचेच निवडणुकीनंतर पाहायला मिळेल़,’ असा टोला जगतापांनी लगावला़ जगताप म्हणाले, ‘गुजरातमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने शहांना तडीपार करण्यात आले होते़ ते शहा आता महाराष्ट्र घडविणार आहेत, असे म्हणतात; पण साधू संतांच्या अन् सुसंस्कृत महाराष्ट्र अशा संधिसाधूला दाद देणार नाही़ महाराष्ट्र घडविण्यासाठी इथली जनता समर्थ आहे़’ ‘सध्या कऱ्हाड दक्षिणेत अनेक पक्षांच्या अनेक नेत्यांचा सुळसुळाट वाढलाय, तर कऱ्हाडचा नेता महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरत आहे़ बाहेरून येऊन कऱ्हाडच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्या या नेत्यांना तुम्ही मतदानाद्वारे त्यांची जागा दाखवून द्या़’ (प्रतिनिधी) कोण हा ‘सडक’मंत्री नितीन गडकरींचा समाचार घेताना जगताप म्हणाले, ‘ते केंद्रात ‘सडक’मंत्री आहेत; पण लोकांवर छाप पडावी म्हणून काहीही बोलतोय़ १९९० मध्ये वाड्यात राहणारे गडकरी अन् सध्याचे गडकरी यांची चौकशी होणे गरजेचे आहे़ स्वत:च्या मुलाच्या लग्नाला १०० विमाने येतात अन् आम्हाला उपदेशाचे डोस पाजतात़ त्यांनी स्वत:ची नैतिकता तपासावी, अन् मगच बोलावे़’