आता बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना नाष्टा-जेवण !
By admin | Published: May 16, 2016 12:46 AM2016-05-16T00:46:01+5:302016-05-16T00:49:55+5:30
कर्मचारी सुखावले : खात्याकडून खास अन्नपूर्णा व्हॅनची निर्मिती
प्रगती जाधव-पाटील / सातारा
कर्तव्य बजावताना घड्याळ न बघता काम करणाऱ्या पोलिसांची बंदोबस्त काळात अन्नाअभावी फार आबाळ होत होती. पोलिस कर्मचाऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन सातारा पोलिस दलाच्या वतीने अन्नपूर्णा व्हॅनची निर्मिती केली. साताऱ्यातील प्रयोगाची यशस्वीता बघून विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी ही संकल्पना कोल्हापूर परिक्षेत्रात राबविण्याच्या लेखी आदेशाद्वारे सूचना केल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात पोलिसांवर गुन्ह्यांपेक्षाही यात्रा, जत्रा, उत्सव आणि निवडणूक यांचा ताण असतो. सलग येणाऱ्या यात्रा, जत्रा आणि संवेदनशील गावांमुळे प्रत्येक ठिकाणी पोलिसांची कुमक द्यावी लागते. बंदोबस्ताच्या वेळी कडक पहारा देऊन कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना अनेकदा रात्री उशिरा जेवण न मिळाल्याच्या घटना पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यापर्यंत पोहोचल्या.
कर्मचाऱ्यांच्या जेवणाची काहीतरी सोय झाली पाहिजे या विचारातून मग अन्नपूर्णा व्हॅनची संकल्पना सातारा पोलिसांत आली. या व्हॅनची सर्वस्वी निर्मिती साताऱ्यात झाली आहे. एकावेळी सुमारे सातशेहून अधिक पोलिसांच्या ताज्या जेवणाची सोय या व्हॅनमार्फत होत आहे.
अशी झाली निर्मिती
अन्नपूर्णा व्हॅन सातारा पोलिस मोटर परिवहन विभागाच्या वतीने तयार केली आहे. अत्याधुनिक किचनच्या सर्व सोयी यात आहेत. घरातील किचनसारखीच याची रचना असून, किचन कट्टा, एक्झॉस्ट फॅन, मॉड्युलर किचनची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. सुरक्षिततेचा विचार करून फायर एस्ंिटगविशरही बसविण्यात आला आहे. स्वयंपाक करताना व्हॅनमधील वातावरण थंड राहावे, यासाठी लाकडाचा वापर करण्यात आला आहे.
अशी असते सोय
बंदोबस्ताच्या ठिकाणाची माहिती कर्मचाऱ्यांना दिली जाते. त्यानंतर आवश्यक तेवढे पीठ, तेल, कडधान्य, नाष्ट्याचे पदार्थ घेऊन ही व्हॅन निघते. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना दर्जेदार आणि कसदार अन्न मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. अनेकदा भाजी, दूध आणि अन्य जिन्नस यांची सोय मुक्कामाच्या गावाच्या ठिकाणी केली जाते. स्वयंपाकासाठी पाणी देण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याकडे सोपविण्यात आली आहे.
सात जणांची टीम
कर्तव्य बजावताना पोलिसांचे अनेकदा आहाराकडे दुर्लक्ष होते. म्हणून त्यांना पुरेशी प्रथिने, लोह आदी योग्य प्रमाणात मिळावे यासाठी मुख्य कुक प्रयत्नशील असतो. त्याच्याबरोबर एक सहायक आणि ६ मदतनीस अशी टीम असते. कमीत कमी दीडशे आणि जास्तीत जास्त सातशे पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक असणारे डिस्पोजेबल ताट, वाटी, कप यांचा साठा त्यात आहे.