पालिकेचे आता पोलमुक्त रस्ता अभियान
By admin | Published: February 19, 2015 10:30 PM2015-02-19T22:30:51+5:302015-02-19T23:45:18+5:30
कामांना वेग : शहरातील रस्ते होणार रुंद आणि सुरक्षित
सातारा : गळतीमुक्त शहर अभियानाप्रमाणेच आता सुरक्षित वाहतुकीसाठी पोलमुक्त रस्ता अभियान राबविण्याच्या सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिल्या असून, या अभियानाचीही अंमलबजावणी लवकरच होणार आहे. त्यामुळे सातारा शहरातील रस्ते रुंद आणि सुरक्षित होणार आहेत. शहरात सध्या रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, अनेक रस्त्यांवर विद्युत आणि बीएसएनएल कंपनीचे खांब असल्याने रुंदीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. या खांबांमुळे वाहतूक असुरक्षित बनली आहे. त्यामुळे रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारे खांब हटवणे अत्यावश्यक आहे. शहरातील मोती चौक ते प्रतापगंज पेठ, शाहू चौक ते समर्थ मंदिर रस्ता, शाहूपुरी ते राजवाडा, समर्थ मंदिर चौक- गोल मारुती मंदिर ते राजवाडा आदी रस्त्यांच्या रुंदीकरण व डांबरीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. भविष्यातील वाहतूक समस्येचा विचार करून पालिका हद्दीतील सर्वच रस्त्यांवरील विद्युत व बीएसएनएल कंपनीचे पोल हटविणे आवश्यक आहे. याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून, रस्त्यात असणारे सर्व पोल तातडीने हटवावेत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)
चार दिवसांत अंमलबजावणी
वीजवितरण कंपनी व इतर संबंधितांकडून कार्यवाही होण्याची वाट न पाहता पालिका प्रशासनाने रस्त्यातील पोल हटवावेत, असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यानुसार पालिका प्रशासन शहरात पोलमुक्त रस्ता अभियान राबवणार असून, त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल, असे मुख्याधिकारी बापट यांनी सांगितले.