पर्यटनस्थळांवर आता ‘स्मार्ट पोलिसां’ची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2016 12:11 AM2016-05-07T00:11:06+5:302016-05-07T00:48:48+5:30

प्रशिक्षित पथक लवकरच तैनात : महाबळेश्वर येथे उन्हाळी हंगाम नियोजन बैठकीत माहिती

Now the 'smart police' look at the tourist places | पर्यटनस्थळांवर आता ‘स्मार्ट पोलिसां’ची नजर

पर्यटनस्थळांवर आता ‘स्मार्ट पोलिसां’ची नजर

Next

महाबळेश्वर : जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा राज्याच्या धर्तीवर सातारा जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने ‘स्मार्ट टुरिझम पोलिस’ असे एक अधिकारी व दहा पोलिस कर्मचारी यांचे एक पथक स्थापन करण्यात येणार
आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे यांनी दिली.उन्हाळी हंगामातील वाहतूक नियोजन करणे व वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविणे व त्या संदर्भात नागरिकांच्या सूचना व हरकती यांचा विचार करण्यासाठी पोलिस ठाण्यात नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे यांच्या प्रमुख उपस्थिती पोलिस ठाण्यात बैठक अयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने उपस्थित होते.नगराध्यक्षा तोष्णीवाल म्हणाल्या, पर्यटकांच्या माहितीसाठी दिशादर्शक फलक लावले जातील. गेली तीन ते चार वर्षे हंगामात वाहतुकीची कोंडी होते. या कोंडीमुळे पर्यटकांची संख्या घटण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पालिकेच्या वतीने रे गार्डन येथे वाहनतळाचे काम सुरू करण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात आहे.
सध्या पोलिस खात्याने येथे आलेल्या पर्यटकांची हॉटेलवर जाऊन तपासणी सुरू केली आह. ती स्वागतार्ह बाब असून या तपासणीवर भर दिला पाहिजे असेही तोष्णीवाल यांनी स्पष्ट केले.उपविभागीय पोलिस अधीक्षक दीपक हुंबरे यांनी नागरिकांच्या अडचणी व सूचना ऐकल्या. त्याबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. तसेच काही नागरिकांच्या तक्रारीसाठी स्थळ भेट देण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)

वॉच ठेवण्यासाठी २५ ठिकाणी सीसीटीव्ही बसविणार
पालिकेने पंधरा दिवसात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी २५ सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांबरोबरच स्थानिकांनीही वाहतुकीचे नियम पाळून कारवाई टाळून उन्हाळी हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा उज्वला तोष्णीवाल यांनी बैठकीत केले.
नगरसेवक, व्यापारी अनुपस्थित
नेहमीप्रमाणे राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी यांनीही या बैठकीकडे पाठ फिरविली. या संदर्भात पोलिसांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही बैठकीबाबत सर्वांना कल्पना दिली होती, तर काही नगरसेवक व व्यापारी यांनी आम्हाला पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीची कल्पनाच नाही. कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांनी दिली नाही, असे परस्परविरोधी दावे केले.

असे असेल पोलिसांचे काम
पथकातील सर्वांना वेगळे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पर्यटकांना हवी ती माहिती पुरविणे, पर्यटकांच्या सुरक्षा अबाधित राखणे हे त्यांचे काम असेल. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून स्थानिक पोलिसांना मदत करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत. म्हणूनच या पथकातील सर्व कर्मचारी यांना अधिकाधिक भाषांचे ज्ञान असेल, त्यांचा गणवेश वेगळा असले, त्यांना मेगा फोन सायरन अत्याधुनिक संपर्क यंत्रणा व शस्त्र सामुग्री यांनी सज्ज असलेली एक जिप देण्यात येणार आहे. पर्यटकांना निवासस्थाने त्यांचे दर, टॅक्सी, गाईड, घोडे हे कोठे मिळतील व त्यांचे दर काय असतील, याची माहिती त्यांच्याकडे असेल. विविध पॉईंटस्ची माहिती पोलिस देतील. महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा व कास या ठिकाणी हे पथक फिरणार आहे.

Web Title: Now the 'smart police' look at the tourist places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.