आता थांबायचं नाय... लढायचं!
By Admin | Published: February 12, 2017 10:27 PM2017-02-12T22:27:28+5:302017-02-12T22:27:28+5:30
बंडखोरांचा एल्गार : राष्ट्रवादी, काँगे्रससह भाजप, शिवसेनालाही दुखणे
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या प्रतिस्पर्धी पक्षांची संख्या मोठी असल्याने इच्छुकांना पर्याय उपलब्ध झाले आहेत. सर्वच पक्षांचा जोर सर्वत्र असला तरी आपल्या पक्षाशी बंडखोरी करत स्वतंत्रपणे लढण्यासाठी सज्ज झालेल्या इच्छुकांची संख्याही मोठी आहे. आता थांबायचं नाय... लढायचं! असाच इशारा जणू बंडखोरांनी दिला आहे.
जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी, काँगे्रस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच होणाऱ्या लढतींमुळे बंडखोरीचे पीक जोरात उगवते. हे चित्र आता बदललेले पाहायला मिळते. नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँगे्रस हेच दोन पक्ष एकमेकांविरोधात दंड थोपटत राहिले. आता मात्र केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजप व शिवसेनेसह त्यांचे मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांनीही दंड थोपटले. भारिप बहुजन महासंघानेही काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे इच्छुकांना विविध पक्षांचे पर्याय उपलब्ध झाले. या परिस्थितीत बंडखोरी कमी होईल, असे स्पष्टीकरण दिले जात होते. आता मात्र, याउलट परिस्थिती पाहायला मिळते आहे.
अनेक वर्षे पक्षासाठी काम करत असताना किमान जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तिकीट तरी पक्षाने द्यावे, अशी इच्छा बाळगणारे आता चांगलेच इरेला पेटले आहेत. पक्षांतर्गत राजकारणाच्या परिणामातून अनेकांना उमेदवाऱ्या नाकारल्या गेल्या आहेत, ते लोक चवताळून उठले आहेत. अनेकांनी पक्षनेतृत्वाच्या हाती राजीनामे टेकवून बंडाचे निशाण फडकावले आहे.
सातारा तालुक्यात शेंद्रे गटातून खासदार उदयनरजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीतर्फे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांना उमेदवारी मिळाली आहे. याच ठिकाणी उदयनराजे समर्थक व माजी पंचायत समिती उपसभापती सूर्यकांत पडवळ यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून पडवळ अर्ज कायम ठेवण्यावर ठाम असल्याने साविआची कोंडी झाली आहे. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक गटात राष्ट्रवादीने मंगेश धुमाळ यांना उमेदवारी दिली आहे. या गटातून लालासाहेब शिंदे हे राष्ट्रवादीतून इच्छुक होते. त्यांना डावलले गेल्याने शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. ल्हासुर्णे गटात काँगे्रसचे नवनाथ केंजळे यांनी बंडखोरीची तयारी केली आहे. वाठार किरोली गटात काँगे्रसचे जितेंद्र भोसले बंडखोरीच्या तयारीत आहेत.
पाटण तालुक्यातील म्हावशी गट हा पाटणकर गटाचा बालेकिल्ला समजला जातो, पाटणकर गटाने पर्यायाने राष्ट्रवादीने राजेश पवार यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी ज्ञानदेव गावडे, उदय संकपाळ यांनी कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही. असे ठरवून उमेदवारी दाखल केली असल्याने इथे जोरदार लढत होणार आहे. मल्हारपेठ गटात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या विरोधात आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडीकडून विजय पवार यांना उमेदवारी मिळाली असल्याने येथे शिवसेनेअंतर्गतच वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
फलटण तालुक्यात साखरवाडी गटामध्ये राष्ट्रवादीने माजी जिल्हा परिषद सदस्य शिवांलीराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज होत पुष्पाताई सस्ते यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. माण तालुक्यातील बिदाल गटात काँगे्रसने अरुण गोरे यांना उमेदवारी दिली असल्याने दादासाहेब काळे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. तालुक्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, रासप अशी पंचरंगी निवडणूक होणार आहे.
खटावमध्ये निमसोड गटात अपक्षांनी मोट बांधली आहे. काँगे्रसने औंध गटात पोपटराव झेंडे यांना उमेदवारी दिली असल्याने सत्यवान कमाने यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. निमसोड गटात राष्ट्रवादी काँगे्रसने प्रा. अर्जुन खाडे यांना उमेदवारी दिली असल्याने एनकूळचे सदाशिव खाडे पेटून उठले आहेत. मायणी व निमसोड गटात शिवसेना-भाजपने साटेलोटे केले आहे.
खंडाळा तालुक्यात शिरवळ गटामध्ये राष्ट्रवादीने नितीन भरगुडे-पाटील यांना उमेदवारी दिली असून, राष्ट्रवादीचे उदय कबुले हे नाराज झाले. त्यामुळे ते बंडाच्या तयारीला लागले आहेत. भादे गटात सुनीता धायगुडे, उज्ज्वला विवेक पवार, खेड बुद्रुक गटात राष्ट्रवादीचे मनोज पवार यांच्याशी रमेश धायगुडे-पाटील यांनी पंगा घेतला आहे. शिरवळ गणात दशरथ निगडे, नायगाव गणात राजेंद्र नेवसे, खेड बुद्रुक गणात अलका धायगुडे या राष्ट्रवादीच्या प्रवाहातील कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. काँगे्रसचे चंद्रकांत ढमाळ यांच्याविरोधात अजय धायगुडे-पाटील यांनी दंड थोपटले आहे.