आता विकेंड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:21+5:302021-06-30T04:25:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यवसायावर दुष्परिणाम झाले आहेत. लोक घराबाहेर फिरत नाहीत. अन प्रशासनाच्या नियमांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारीमुळे हॉटेल व्यवसायावर दुष्परिणाम झाले आहेत. लोक घराबाहेर फिरत नाहीत. अन प्रशासनाच्या नियमांचे पालन केले नाही तर कारवाईची टांगती तलवार अशा दुहेरी संकटात हॉटेल व्यावसायिक सापडले असून आता विकेंड लॉकडाऊनमध्ये हॉटेलिंगही बंद राहणार असल्याने त्यांची मोठी पंचाईत झालेली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार दोन दिवस जिल्ह्यात पूर्ण संचारबंदीचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाबळेश्वर, पाचगणी, कोयना परिसरात शुक्रवारीच पर्यटक दाखल होतात. शनिवार, रविवार तेथीलच हॉटेलमध्ये मुक्काम करतात. त्यामुळे त्यांना जेवण मिळते. मात्र साताऱ्यात हॉटेलचालकांची पंचाईत झालेली आहे. कासची फुले पाहता येणार नसल्याने पर्यटक साताऱ्याकडे फिरकतदेखील नाहीत. कोयना, महाबळेश्वर, पाचगणी या परिसरात भटकंती करून ते आपल्या घराकडे परततात. या परिस्थितीत सातारा शहर व उपनगरातील हॉटेल व्यावसायिकांपुढे प्रश्नचिन्ह आहे.
साताऱ्यातील एकूण हॉटेल्स : ५१४
हॉटेलवर अवलंबून असलेले कर्मचारी : १ हजार
हॉटेल कर्मचाऱ्यांचे आणखी हाल
कोट...
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हॉटेल बंद आहेत. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खेडेगावातून पोटासाठी शहरात आलो, आता घरभाडेही देणे शक्य नाही. शासनाने यासाठी स्वतंत्र अनुदान देऊन मुलाबाळांच्या शिक्षणाचा तरी खर्च उचलावा.
प्रकाश बाबर, हॉटेल कामगार
कोट...
मी उत्तम आचारी आहे. मात्र गावाकडे काम मिळत नाही, म्हणून उत्तर प्रदेशातून मी साताऱ्यात आलाे. सोबत कुटुंबही आणले. मुलांना येथीलच शाळेत घातले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हॉटेल मालकांनी काही दिवस मदत केली. आता त्यांनाही मदत करणे शक्य नाही.
सूरजमल शिसोदिया, हॉटेल कामगार
हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया
कोट..
कोरोना महामारीत महाबळेश्वरातील पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना हातावर हात धरून बसावे लागले आहे. हॉटेल्सचा देखभाल खर्च कसा करायचा, हा प्रश्न असून मी तर या काळात गॅरेज चालवून उदरनिर्वाह चालवला आहे.
राहुल उत्तेकर, हॉटेल व्यावसायिक महाबळेश्वर
कोट...
कोरोनामुळे हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. मात्र या व्यवसायासाठी लाखो रुपयांची उचललेली बँकांचे कर्ज माफ केलेले नाही. कोरोना काळात व्याजावर व्याज लागत आहे. तर कामगारांचा पगार करणे देखील मुश्कील असून मिळणाऱ्या कर्जातूनच त्यांचे पगार केले जात आहेत. शासनाने कोरोना काळातील बँकाच्या कर्जाचे व्याज माफ करणे आवश्यक आहे.
साेमनाथ शिराळ, हॉटेल व्यावसायिक सातारा