औंधला रुग्णसंख्या कमी होतेय; मात्र काळजी आवश्यक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:33+5:302021-05-31T04:28:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औंध : औंधमध्ये मागील काही दिवसांपेक्षा या आठवड्यात रुग्णसंख्या कमी आली आहे, तर शनिवारी एकही रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : औंधमध्ये मागील काही दिवसांपेक्षा या आठवड्यात रुग्णसंख्या कमी आली आहे, तर शनिवारी एकही रुग्ण सापडला नाही. त्यामुळे साखळी तुटण्यास काहीअंशी यश मिळाले आहे. मात्र, असे असले तरी आजूबाजूच्या गावात रुग्णसंख्येचा विचार करता काळजी घेणे, हाच कोरोनावर उपाय असल्याचे दिसत आहे.
१ ते २६ मेपर्यंत औंधमध्ये २६१ रुग्णसंख्या झाली होती. दररोज दोन अंकी रुग्ण सापडत होते. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या प्रयत्नांमुळे मागील आठवड्यात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश मिळाले. यातील अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता प्रत्येक आठवड्यात रुग्णसंख्या एक अंकी संख्येत सापडत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. आजअखेर औंधमध्ये ७८ रुग्ण कोरोनाशी लढा देत आहेत, तर शनिवारी एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही.
औंधच्या आजूबाजूच्या गावांमधून रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आता कोरोना चाचणी चाचणीबरोबरच प्रबोधन आवश्यक आहे. कोरोना येऊन दाराजवळ ठेपला तरी लोक चाचणी करण्यासाठी जात नसल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी दुखणे अंगावर काढत शेवटी चाचण्या करण्यासाठी पळापळ करताना नागरिक दिसत आहेत. आरोग्य विभागाने ग्रामीण भागात गावोगावी कोरोना चाचणी शिबिर घेणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे गावोगावच्या रुग्णसंख्येवर प्रशासनाला काम करणे सोपे होणार आहे.
कोट..
नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेतली म्हणजे लगेच उपचार सुरू होत असतो. कोरोना चाचणीला जेवढा वेळकाढूपणा केला जाईल. त्यामुळे उपचाराला उशीर होतो. थोडा जरी शारीरिक त्रास झाला तरी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनी न घाबरता व लाजता लगेच चाचणी करून घ्यावी.
-दिनकर शिंगाडे, उपसरपंच, खरशिंगे