आई-वडील मुलांना वाटतायत अडगळ!, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 04:37 PM2022-01-03T16:37:46+5:302022-01-03T18:31:34+5:30
व्यसनाधीन झालेला मुलगा काैटुंबिक कलहाचे कारण देत चक्क आई-वडिलांना घराबाहेर काढतोय. अशा प्रकारच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समाजात वाढू लागल्या आहेत.
दत्ता यादव
सातारा : वंशाचा दिवा म्हातारपणाची काठी ठरेल, अशी अशा घेऊन एक-एक दिवस पुढे ढकलणाऱ्या अनेक वयोवृद्धांचे आयुष्य अलीकडे अंधारमय झाल्याचे पाहायला मिळतंय. व्यसनाधीन झालेला मुलगा काैटुंबिक कलहाचे कारण देत चक्क आई-वडिलांना घराबाहेर काढतोय. अशा प्रकारच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समाजात वाढू लागल्या असून, अशा दिवट्यांवर ज्येष्ठ नागरिक पालनपोषण या कलमाअंतर्गत पोलिसांकडून गुन्हे दाखलही केले जात आहेत.
आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्या. त्यांनीच उतारवयात अशी परतफेड केल्याने अनेक वृद्ध आई-वडिलांचे मानसिक, शारीरिक संतुलन बिघडलंय. त्यांच्या दैनंदिन गरजा भागविताना त्यांच्या नाकेनऊ येऊ लागलंय. एकाच कुटुंबात आई-वडील व मुलांच्या नातेसंबंधातील दुरावा व कोरडेपणा दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. त्यातूनच मुलांकडून आई-वडिलांकडे होणारे दुर्लक्ष व जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती वाढतेय. यामुळेच त्यांच्यात वाद होतायेत.
आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणे, त्यांना वेळच्या वेळी जेवण न देणे, डॉक्टरांकडे घेऊन न जाणे, औषधे संपल्यास ती पुन्हा घेऊन न देणे, डांबून ठेवणे, वृद्धाश्रमात सोडण्याची भीती दाखवणे, असे प्रकार केले जात आहेत. एवढेच नव्हे तर आई-वडिलांना घराबाहेरही काढल्याचे प्रकार समोर येत आहेत.
कायदा काय सांगतो..
ज्येष्ठ नागरिक आणि आई-वडील पालनपोषण कायदा हा २००७ मध्ये करण्यात आला आहे.
मात्र, वयामुळे वृद्धांना ना न्यायालयात जाता येते ना पोलीस ठाण्यात. हा कायदा त्यांच्या बाजूने असला तरी अनेक जण आपली समाजात इज्जत जाईल, म्हणून मुलाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. मुलाचा अन्याय गपगुमान सहन करणारे अनेक पालक आहेत.
ही घ्या उदाहरणे
- सातारा शहराजवळ संगम माहुली आहे. या गावातील आठ वर्षे सैन्यातून नोकरी करून आलेेला एकुलता एक मुलगा कधी व्यसनाधीन झाला हे वडिलांनाही कळले नाही. आता मुलाच्या व्यसनापायी अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झालंय. आईवडील, पत्नी यांना तो वारंवार मारहाण करतोय. त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून अखेर वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलाविरोधात तक्रार दिलीय.
- साताऱ्यातील भवानी शाळेजवळ वास्तव्यास असणाऱ्या ७५ वर्षांच्या वडिलांनाही वेळोवेळी शिवीगाळ करून मुलाने मारहाण केली. यापुढे जाऊन मुलाने वडिलांना घरातून बाहेर काढले. त्यांचे साहित्य रस्त्यावर फेकले. याप्रकारानंतर वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अखेर मुलावर गुन्हा दाखल केला.
- सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ७० वर्षीय आजीबाईला तिच्या मुलाने आणि मुलींनी घरातून हाकलून दिले. सरतेशेवटी या वृद्धेवर भीक मागण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, ही वृद्ध महिला पोलिसांकडेच पैसे मागत होती. त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आणि संबंधित मुलगा आणि मुलीवर पोलिसांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.