कोरोना घटला.. निर्धास्तपणा वाढला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 12:37 PM2021-11-19T12:37:13+5:302021-11-19T12:39:31+5:30
सचिन काकडे सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पहिला व दुसऱ्या लाटेने अक्षरश: तांडव घातले. या लाटेत कधीही भरून न ...
सचिन काकडे
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पहिला व दुसऱ्या लाटेने अक्षरश: तांडव घातले. या लाटेत कधीही भरून न येणारे नुकसान झाले. आता तिसरी लाट येऊ नये, ही अपेक्षा आरोग्य यंत्रणा व सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत; मात्र नागरिकांचा निर्धास्तपणा काही केल्या कमी होईना. कोरोनाची लाट ओसरत असताना सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे असे प्रकार नागरिकांकडून वारंवार केले जात आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाला देखील मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा विसर पडल्याचे दिसते.
निष्काळजीपणा सोडून थोडी काळजी घ्याच..
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना रुग्ण व मृतांनी उच्चांक गाठला. दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण आढळून येत होते. तर ४५ ते ५० रुग्ण दगावत होते. एकवेळ अशी होती की बाधितांना उपचारासाठी बेडही मिळत नव्हते. त्यामुळे हजारो रुग्ण घरातूनच उपचार घेत होते. आरोग्य यंत्रणा व नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागली आहे. आता पूर्वीसारखी परिस्थित नसली तरी नागरिकांनी निष्काळजीपणा सोडून स्वत:ची व इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे.
या होतायत चुका
- कोरोना गेला, या अविर्भावात प्रत्येक नागरिक वावरु लागला आहे.
- किराणा, कापड दुकाने, भाजी मंडई, बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत आहे.
- बहुतांश नागरिक मास्क वापरण्याचीही तसदी घेत नाहीत.
- कोरोना नियमावलीचे पालन केले जात नाही.
- स्थानिक प्रशासनाकडूनही कोणतीच कारवाई केली जात नाही.
हे करायलाच हवं
- गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
- मास्कचा नियमित वापर करा
- एकच मास्क सातत्याने वापरु नका
- सॅनिटायझरचा वापर करा
- बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवा
कोरोनाने कोणी घरातील कर्ता पुरुष गमावला तर कोणी आई, वडील. हा भीषण संकटातून आता जो-तो सावरू लागला आहे. कोरोनाचे संक्रमण कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर येत आहे; मात्र नागरिकांनी गाफील न राहाता या छुप्या शत्रूपासून स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायलाच हवी. - श्रीरंग काटेकर, सातारा.
जिल्ह्यात व्यापक स्वरूपात जनजागृती झाली. लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे कोरोना संक्रमण कमी झाले आहे. नागरिकही आता योग्य ती काळजी घेत आहेत. तरीही नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करून गर्दीत जाणे टाळावे. तरच कोरोना संक्रमण पूर्णपणे आटोक्यात येईल.- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.