सातारा तालुक्यातील रुग्णसंख्या ४१ हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:24 AM2021-07-09T04:24:52+5:302021-07-09T04:24:52+5:30
सातारा : जिल्ह्यात सव्वा वर्षापासून कोरोना विषाणूचं संकट असून, आतापर्यंत जवळपास २ लाख रुग्ण सापडले आहेत. यामधील ४१ हजारांवर ...
सातारा : जिल्ह्यात सव्वा वर्षापासून कोरोना विषाणूचं संकट असून, आतापर्यंत जवळपास २ लाख रुग्ण सापडले आहेत. यामधील ४१ हजारांवर रुग्ण हे एका सातारा तालुक्यातील आहेत. तसेच कोरोना बळींची संख्याही सातारा तालुक्यातच सर्वाधिक राहिली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत एप्रिलपासून कोरोनाबाधितांचा विस्फोट सुरू झाला. दिवसाला दोन हजारांवर बाधित आढळून येत होते तसेच मृतांचा आकडाही वाढत होता. पण, जून महिना सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आली. गेल्या काही दिवसांत तर एक हजारांच्या आत बाधित सापडू लागले आहेत. त्यातच प्रशासनाने कोरोनाविषयक निर्बंध कमी केले होते. यामुळे नागरिकांची गर्दी वाढली. त्यामुळे बाधितांची संख्या आणखी कमी होण्याऐवजी स्थिर राहिली तर बुधवारपासून अनेक दिवसानंतर बाधित संख्येने १ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाखांवर रुग्ण आढळले. त्यामधील ४१ हजारहून अधिक रुग्ण हे एका सातारा तालुक्यातील आहेत. सुरुवातीपासूनच सातारा तालुक्यातील बाधित संख्या सर्वात अधिक राहिली आहे. तर कोरोना मृतांची संख्याही साताऱ्यातच सर्वाधिक आहे. सातारा तालुक्यात आतापर्यंत ४१,५७८ रुग्ण आढळले आहेत तर १,२३१ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर कऱ्हाड आणि फलटण या तालुक्यांचा क्रमांक लागतो.
..................................................