टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या हजाराजवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:19 PM2019-06-02T23:19:40+5:302019-06-02T23:19:44+5:30
नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती वाढली असून, सध्या २३१ गावं ...
नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती वाढली असून, सध्या २३१ गावं आणि ९५९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. तर तब्बल ४ लाख नागरिक आणि २ लाख पशुधन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यास जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी पूर्व भाग मात्र, कोरडाच राहिला. सुरुवातीच्या काळात मान्सूनचा पाऊस झाला. पण, आॅगस्टनंतर पूर्व दुष्काळी भागात अपवादानेच पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच माण तालुक्यातील अनेक गावांत टंचाईची स्थिती निर्माण झाली होती.
माण तालुक्यातील सध्या ७८ गावे आणि ६१५ वाड्यांना ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर १ लाख ४४ हजार ९८९ नागरिक आणि ६४ हजार ७०० पशुधन अवलंबून आहे. या तालुक्यासाठी टँकर खेपा २३५ मंजूर असल्या तरी शुक्रवारी फक्त १९२ झाल्या. खटाव तालुक्यातही टंचाईची तीव्रता वाढली असून ४८ गावं आणि १६६ वाड्यांसाठी ४३ टँकर सुरू आहेत. तालुक्यातील ९१ हजार ८८० नागरिक आणि ४२ हजार ७३९ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तालुक्यात १ टँकर वाढला आहे. कोरेगाव तालुक्यातही टंचाईची स्थिती असून, ३३ गावांना ३६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ४९ हजार ५० नागरिक व २२ हजार ५१२ पशुधन टँकरवर तहान भागवत आहे.
फलटण तालुक्यातही टंचाई गावांच्या संख्येत वाढ झालीय. तालुक्यातील ३४ गावं व १५० वाड्यांतील ७८ हजार ६२३ ग्रामस्थ आणि ४८ हजार २५२ पशुधनाला टँकरचा आधार आहे. तालुक्यात ३७ टँकरची चाकं दुष्काळग्रस्तांसाठी धावत आहेत. वाई तालुक्यात ८ गावं व ४ वाड्यांसाठी ७ टँकर सुरू आहेत. ६ हजार ३८३ ग्रामस्थ आणि ७ हजार ५८८ पशुधनाला टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. खंडाळा तालुक्यात २ टँकर सुरू असून त्या माध्यमातून ३ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यात सध्या ७ गावं आणि ३ वाड्यांसाठी ४ टँकर मंजूर आहेत. सातारा तालुक्यातही एक गाव आणि ५ वाड्यांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. कºहाड तालुक्यातील ६ गावांत टंचाईची स्थिती आहे.
पावसाचा तालुका अशी ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील २ गावं अन् ७ वाड्यांना टंचाईची झळ बसलीय. तेथील ४ हजार ३८४ ग्रामस्थ आणि १ हजार ४२७ जनावरांसाठी ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर जावळी तालुक्यातही १३ टँकरची चाकं फिरत आहेत. या टँकरवर ११ गावं आणि ९ वाड्यांतील ११ हजार २६० ग्रामस्थ अवलंबून आहेत.