ग्रामीण नेतृत्वाला मिळणार संधी, मिनी मंत्रालय होणार मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 02:24 PM2021-12-08T14:24:24+5:302021-12-08T14:25:05+5:30
जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक गट. मागील निवडणूक झाल्यानुसार कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक १२ आणि सातारा तालुक्यात १० जिल्हा परिषद गट आहेत.
नितीन काळेल
सातारा : महाविकास आघाडी शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढवण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सातारा जिल्ह्यातही ६४ गट असलेतरी नवीन गटाची संख्या ७४ तर गणांची १४८ पर्यंत पोहोचू शकते. असे झाले तर ग्रामीण भागातील नेतृत्वाला आणखी संधी मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मागील सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढविण्यास मान्यता देण्यात आली. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सध्या राज्यात कमीत कमी जिल्हा परिषद गटांची संख्या ५० आहे, तर सर्वाधिक संख्या ही ७५ पर्यंत असते. मात्र, शासनाचा गट वाढविण्याचा हा निर्णय अमलात आल्यास जिल्हा परिषद गट संख्या कमीत कमी ५५ आणि अधिकाधिक ८५ पर्यंत जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९ (१) मध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.
कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक गट...
सातारा जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेचे ६४ गट तर पंचायत समितीचे १२८ गण आहेत. शासन निर्णयानुसार ही संख्या ७४ गट आणि १४८ गणांपर्यंत पोहोचू शकते. मागील निवडणूक झाल्यानुसार जिल्ह्यात सध्या कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक १२ आणि सातारा तालुक्यात १० जिल्हा परिषद गट आहेत. तर महाबळेश्वर तालुक्यात अवघे दोन गट आहेत. शासनाचा निर्णय अमलात आल्यास ६४ मध्ये आणखी काही गट वाढणार आहेत.
काही वर्षांपूर्वी गट झाले कमी...
सातारा जिल्ह्याचा मागील काही वर्षांचा विचार केला असता, पूर्वी गटांची संख्या ६७ होती. त्यानंतर ६४ वर आली. तसेच अनेक तालुक्यांच्या ठिकाणी नगरपंचायती झाल्या आहेत. त्यामुळे गट व गणाची नावेही बदलली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सातारा शहराजवळील काही भाग सातारा नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये शाहुपुरी ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. त्यामुळे सातारा तालुक्यात किती गट वाढणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक पुढील वर्षी...
जिल्हा परिषदेची मागील निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. दोन महिन्यांत विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आता दोन महिन्यांचा अवधी उरला आहे. नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू शकते.
गट कुठे, किती वाढणार...
राज्य शासनाचा निर्णय अमलात आल्यास ९ ते १० गट वाढू शकतात. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात दोन, त्याचबरोबर सातारा, खटाव, फलटण, कोरेगाव, माण या तालुक्यांत गट आणि गणांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दहा वर्षांत पाच टक्के लोकसंख्या वाढली...
जिल्ह्यात २०११ साली जनगणना झाली होती. त्यावेळी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३१ लाख होती. आता लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सुमारे पाच टक्के लोकसंख्या वाढ अपेक्षित धरली तरी सध्या ३५ लाखांच्या आसपास नागरिकांचा आकडा आहे. जनगणना झाल्यानंतर जिल्ह्यातील लोकसंख्या समोर येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात स्थलांतरित अनेक झाले आहेत.
सध्याची गट अन् गण संख्या
कऱ्हाड १२ २४
सातारा १० २०
पाटण ०७ १४
फलटण ०७ १४
खटाव ०६ १२
कोरेगाव ०५ १०
माण ०५ १०
वाई ०४ ०८
जावळी ०३ ०६
खंडाळा ०३ ०६
महाबळेश्वर ०२ ०४