आकड्यांची तोड अन् नावांची जोड !
By admin | Published: April 24, 2017 11:38 PM2017-04-24T23:38:00+5:302017-04-24T23:38:00+5:30
दुचाकीवर मिरवतायत फॅन्सी नंबरप्लेट : आडनाव, पडनावांची चलती; नियमांचे सर्रास उल्लंघन, आकडे पुसट
संजय पाटील ल्ल कऱ्हाड
नोंदणीचा क्रमांक लिहिण्यासाठी प्रत्येक वाहनाला नंबरप्लेट असते; पण सध्या बहुतांश वाहनांच्या प्लेटवर आकड्यांऐवजी अक्षरच ठळक दिसतायत. आकड्यांची मोडतोड करून कुणी पडनावाची जुळणी करतोय तर कुणी आडनावाचा रूबाब दाखवतोय. आकडे ‘फॅन्सी’ पद्धतीने रेखाटत काहींनी ‘लव्ह’ साकारलंय, तर देवतांची नावं टाकून काहींनी श्रद्धाळूपणा दाखविण्याचा प्रयत्न केलाय.
दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनधारकांमधील ‘फॅन्सी’ नंबरप्लेटची ‘के्रझ’ सध्या भलतीच वाढली आहे. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपैकी बहुतांश वाहनांच्या नंबरप्लेटवर आकड्यांच्या माध्यमातून शब्द तयार करण्यात आल्याचे दिसून येते़ हे शब्द तयार करतानाही दादा, मामा, भाऊ, तात्या, आबा, बाबा अशी पडनाव किंवा पाटील, पवार अशी आडनाव साकारली जातायत़ आकड्यांची मोडतोड करून नाव साकारण्यासाठी काही ठराविक रेडिअम व्यावसायिक प्रसिद्ध आहेत़ त्यामुळे अशा नंबरप्लेट तयार करण्यासाठी वाहनधारकांची संबंधित व्यावसायिकाकडेच रिघ लागलेली असते़ आकड्यांतून नाव तयार करण्यासाठी किंवा फॅन्सी नंबरप्लेट तयार करण्यासाठी संबंधित व्यावसायिक एरव्हीच्या रेटऐवजी दीडपट अथवा त्याहीपेक्षा जास्त रक्कम आकारतात़
वाहनाचा क्रमांक २१४ असेल तर व्यावसायिक आकड्यांची मोडतोड करीत त्या क्रमांकातून ‘राम’ हा शब्द साकारतात़ वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून २१५१ मधून ‘राजे’, ४२१५ मधून ‘मराठा’, ४९१२ मधून ‘पवार’, ९७७५ किंवा ९११५ मधून ‘भाऊ’, ८०४९ मधून ‘लव्ह’, ३११३ मधून ‘आई’, १६२१ मधून ‘हिरा’ असे शब्द तयार करण्यात येत आहेत़ प्लेटवर क्रमांक लिहिताना तो इंग्रजीमध्ये असावा की मराठीत याबाबत कसलाही नियम नाही़ त्यामुळे बहुतांशजण मोडतोड करून शब्द तयार करता येईल, अशा पद्धतीने क्रमांक टाकतात़ फॅन्सी नंबरप्लेट बनविणाऱ्या वाहनधारकांकडून केंद्रीय मोटर वाहनचे सर्वच नियम मोडीत काढले जात आहेत़ काही वाहनधारक मोडतोड करून शब्द तयार करता येतील, अशा नोंदणी क्रमांकासाठी वाहन घेण्यापूर्वीच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आगाऊ रक्कम जमा करीत आहेत़
वाहतूक शाखेकडून फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाईची मोहीम राबविण्यात येते. दंडही करण्यात येतो. मात्र, या कारवाईत सातत्य राहत नाही. (प्रतिनिधी)
हजार रुपये दंड, प्लेटही जप्त...
फॅन्सी नंबर असणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते़ मात्र, या कारवाईत सातत्य नसल्यामुळे फॅन्सीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे़ नंबरप्लेट फॅन्सी असल्यास नियमानुसार संबंधित चालकाकडून हजार रुपये दंड वसूल केला जातो़ तसेच ती नंबरप्लेटही जप्त केली जाते़ अशा प्रकारची कारवाई कधीतरीच केली जात असल्याने वाहनधारकांमध्ये कारवाईची भीती राहत नाही़ फॅन्सी नंबरप्लेट बेदखल करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन व पोलिसांनी मोहीम राबविणे गरजेचे आहे़