नर्सरी अन् केजीच्या विद्यार्थ्यांचे पुढचे वर्षंही घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:30+5:302021-05-27T04:40:30+5:30
स्टार : ७४७ लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वाढता वाढता वाढे अशी अवस्था जिल्ह्यातील कोरोनाची झाली आहे. गेली दीड ...
स्टार : ७४७
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वाढता वाढता वाढे अशी अवस्था जिल्ह्यातील कोरोनाची झाली आहे. गेली दीड वर्षे निव्वळ कोरोनाशी लढा देण्यासाठी घरी थांबलेल्या बच्चे कंपनीची शाळा यंदाही सुरू होईल, याची काही शाश्वती नसल्याने पालकांची चिंता आणखी वाढली आहे. तिसऱ्या लाटेत लहानग्यांना होणाऱ्या त्रासाच्या धास्तीने येणारं वर्षही घरीच जाणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
मुलांना शिक्षणापासून अंतर मिळू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढं आला. पण हा पर्याय मुलांसाठी फारसा उपयुक्त ठरला नाही, हे सत्य आहे. ज्यांना शाळा म्हणजे काय हे माहिती आहे त्यांना ऑनलाईन शिक्षणाशी जुळवून घेणे तुलनेने सोपे गेले. पण शाळेत दंगा करणं, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणं या गोष्टी अनुभवल्यात त्यांना शाळेविषयी अतोनात ओढ आहे. पण शाळा कशाला म्हणतात, हेच ज्यांना माहिती नाही अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही सुरूवात होणार आहे.
चौकट :
मुलांच्या मानसिकतेवर होतोय परिणाम
गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या भीतीने मुलांचं बालपण काळवंडलं आहे. मोबाईल नको मैदानावर जा म्हणणारे पालक आता मुलांना घरात कोंडून ठेवत आहेत. तिसऱ्या लाटेत छोट्या मुलांवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, पालक अधिक काळजी घेऊ लागले आहेत. जगलो वाचलो तर मुलांना शिक्षण देऊ, ही पालकांची मानसिकता झाली आहे. पण घरात राहून-राहून मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ लागला आहे. बाह्य जगात जे काही सुरू आहे, त्याचं आकलन होत नसल्यानेही मुलं बिथरताहेत, त्यांना त्यांच्या शब्दांमध्ये याविषयी माहिती दिली जावी, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
कोट
मुलांच्या कलाने अभ्यास घेतला तर कोविडच्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण उत्तम पर्याय आहे. घरात बसून मुलांनी गॅझेट किंवा टीव्हीपुढं बसण्यापेक्षा अभ्यास करण्याच्या प्रवाहात विद्यार्थ्यांनी राहणं अपेक्षित आहे. किती टक्के पडले यापेक्षा अभ्यासाचे सातत्य घरात राहून ठेवणं अधिक महत्वाचं आहे.
- मिथीला गुजर, मुख्याध्यापिका
मुलांना शाळेत येता येत नाही, हे खरे आहे. पण आजची पिढी स्मार्ट आहे. पूर्व प्राथमिक विभागाचे विद्यार्थी असले, तरीही त्यांचे मोबाईल, लॅपटॉप, टॅब यांच्याशी सुरेख नाते आहे. गतवर्षीही आम्ही ऑनलाईन पध्दतीने शाळा घेतली. त्याला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
- नेहा शिवदे, शिक्षिका
ऑनलाईन शिक्षण देण्याची योग्य पद्धत अवलंबली तर विद्यार्थ्यांना शिकवलेलं समजू शकतं. मात्र, शाळेच्या वातावरणात मुलांची जी प्रगती होऊ शकते, तेवढी घरी होत नाही. आठवड्यातून तीन दिवस तरी आलटून-पालटून मुलांना शाळा असावी. त्यामुळे त्यांचा सर्वांगिण विकास होतो.
- स्नेहल मोहिते, कऱ्हाड
पालक कोट
कोविडची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत असल्याने मुलांना घराबाहेर पाठवणंही अवघड वाटतंय. ऑनलाईन शिक्षण सुरू असलं तरीही प्रत्यक्ष शाळेची धम्माल अनुभूती त्यात नाही. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेत होणारे संस्कार लाखमोलाचे आहेत.
- जयश्री माने, विलासपूर
ऑनलाईन शिक्षणाने मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवलं, याविषयी दुमत नाही. पण त्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी प्रत्यक्ष शाळा अत्यावश्यक आहे. ऑनलाईन वर्गात बसणं यात कृत्रिमपणा आहे, तर शाळेत जाण्यासाठी मानसिक तयारी करून आवरणं यात वेगळी मज्जा आहे.
- विकास जाधव, संगमनगर
दिवसेंदिवस कोविडची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आता तर लहान मुलांवर त्याचे सर्वाधिक परिणाम जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर वेळ मारून नेणं महत्त्वाचं आहे. मुलांचा विकास होत नसला, तरीही त्यांची अभ्यासाची तोंडओळख होतेय हे महत्त्वाचे.
- डॉ. पौर्णिमा फडतरे, सातारा