अतिस्थुलता निवारण दिन : स्थुलता ठरतेय हृदयविकार अन् कर्करोगाचे कारण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 01:06 PM2021-11-27T13:06:04+5:302021-11-27T13:07:04+5:30
कोविडकाळात घरातच बसून राहण्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत गेला. तरुण आणि लहानग्यांमध्ये असलेली स्थुलता हृदयविकार, कर्करोग यासह मधुमेहालाही आमंत्रण देत असल्याचे तज्ज्ञांच्या अभ्यासातून पुढे आले आहे.
सातारा : बदलती जीवन पद्धती, बैठ्या कामांमध्ये वाढ, अवेळी जेवण, सकस आहाराचा अभाव यामुळे तरुण आणि लहानग्यांमध्ये स्थुलतेचे प्रमाण वाढले आहे. कोविडकाळात घरातच बसून राहण्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत गेला. तरुण आणि लहानग्यांमध्ये असलेली स्थुलता हृदयविकार, कर्करोग यासह मधुमेहालाही आमंत्रण देत असल्याचे तज्ज्ञांच्या अभ्यासातून पुढे आले आहे.
कोरोनाकाळाने मानवी आयुष्यावर खूपच विचित्र पद्धतीने घाला घातला आहे. संसर्गाच्या भीतीने घरात कोंडून राहिलेल्या अनेकांना आता स्थुलता सतावू लागली आहे. वर्क फ्रॉम होममुळे अनेक घरांमध्ये सोफ्यावर बसून काम करणाऱ्यांची संख्या वाढली. सलग दीड वर्षे सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहिलेल्या अनेकांना घराबाहेर पडल्यावरच आपली स्थुलता लक्षात आली. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या हेल्दी सातारकरांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे.
स्थुलता ठरतेय मानसिक आजाराचे कारण
लॉकडाऊननंतर शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली. तब्बल दीड वर्षे कोणत्याही शारीरिक हालचालींशिवाय घरात असणाऱ्या मुलांमध्ये स्थुलतेचे प्रमाण वाढले. वाढलेल्या वजनाची जाणीव अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर होऊ लागली. वजन वाढलेल्या अनेकांना समाजाच्या नजरेने इतक्या तुच्छतेने पाहिले की पुन्हा लोकांमध्ये जाण्याचे धाडसच या मुलांनी दाखविले नाही. घरात पाहुणे आले की आपल्या तब्यतेविषयी काही ऐकून घेण्यापेक्षा खोलीत कोंडून घेण्याचा पर्याय मुलांना सोयीचा वाटला. त्यातून एकलकोंडेपणा, आपण निरुपयोगी असल्याची भावना मुलांमध्ये निर्माण झाली.
कमी वयात जडू लागलेत मोठ्यांचे आजार
हृदयविकार, अर्धांगवायू, हाडांची ठिसुळता, कर्करोग, संधीवात हे आजार पूर्वी पन्नाशी ओलांडलेल्यांमध्ये आढळून यायचे. अलीकडे मात्र अवघ्या विशीतल्या मुलांमध्येही हे आजार आढळू लागले आहेत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या पेशींचे स्थुलतेमुळे नियंत्रण सुटते. त्यामुळे या पेशी दुसऱ्या पेशींबरोबर संघर्षाला सुरुवात करतात. कित्येकदा या संघर्षातून हृदय, फुप्फुस यांच्यासह यकृतावरही आक्रमण केले जाते. परिणामी कमी वयात मोठ्यांचे आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे.
बदलत्या जीवनशैलीने छोट्यासंह मोठ्यांमध्येही स्थुलतेचे प्रमाण वाढवले आहे. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानंतर बहुतांश जणांची वजने किलोने वाढली आणि घटताना मात्र ती ग्राममध्ये होतायत. नियमित शारीरिक व्यायाम आणि सकस आहार या दोन बाबींमुळेच वजन नियंत्रणात येऊ शकते. - डॉ. दीपांजली पवार, मधुमेहतज्ज्ञ, सातारा