कण्हेर पाणी योजनेतील अडथळा अखेर दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:27+5:302021-08-18T04:46:27+5:30
सातारा : कण्हेर पाणीपुरवठा योजनेचा महत्त्वपूर्ण अंतिम टप्पा आता मार्गी लागणार आहे. सारखळ खिंड येथील वनविभागाच्या हद्दीतून साडेतीनशे ...
सातारा : कण्हेर पाणीपुरवठा योजनेचा महत्त्वपूर्ण अंतिम टप्पा आता मार्गी लागणार आहे. सारखळ खिंड येथील वनविभागाच्या हद्दीतून साडेतीनशे मीटर जलवाहिनीचे काम करण्यास वनविभागाने मंजुरी दिल्याने या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे की, शाहूपुरी भागासाठी वरदान असलेल्या कण्हेर योजनेच्या साडेतीनशे मीटर जलवाहिनीचे काम सारखळ खिंडीतील वनविभागाच्या हद्दीतून होणार आहे. या कामाला सातारा वनविभागाने मान्यता दिल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हे काम तातडीने करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत..
शाहूपुरीकरांना चोवीस तास पिण्याचे पाणी मिळावे यासाठी २०१२ मध्ये ४२ कोटींची योजना मंजूर केली. परिपूर्ण सर्वेक्षणानंतर बारा कोटी रुपये अतिरिक्त या योजनेसाठी मंजूर करण्यात आले. सारखळ खिंडीतून साडेतीनशे मीटर जलवाहिनीचे काम हे वनविभागाच्या हद्दीतून करावयाचे होते. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वपूर्ण कामाला अखेर वनविभागाने मंजुरी दिल्याचे खा. उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
(चौकट)
शाहूपुरी येथे घर तेथे नळ
माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील व तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी या योजनेत महत्त्वाची भूमिका बजावली. योजना येत्या काही दिवसांत शक्य तितक्या लवकर पूर्ण केली जाईल असा आमचा कटाक्ष राहणार आहे, असे खासदार उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, शाहूपुरीत घर तेथे नळ हा उपक्रम राबवून नागरिकांना तत्काळ नवीन नळ कनेक्शन देण्याचे स्पष्ट आदेश खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिले आहेत.