ऑक्टोबर हिटचा तडाखा; साताऱ्याचा पारा ३५ अंशाजवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 12:13 PM2023-10-14T12:13:06+5:302023-10-14T12:13:39+5:30
पाऊस गेल्याने बसू लागले उन्हाचे चटके
सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस अपेक्षित न पडल्याने उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे सातारा शहराचा पाराही ३५ अंशाजवळ जात असल्याने दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके चांगलेच जाणवत आहेत. या ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना सर्दी, ताप, थंडीसारखे आजार होऊ लागले आहेत.
जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा पाऊस पडतो. तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तरी परतीचा पाऊस होत असतो. यंदा मात्र, मान्सूनचा पाऊस कमी झाला. तर परतीचा पाऊसही रुसला. त्यामुळे यंदा आठ दिवस अगोदर परतीच्या पावसाने जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे. परिणामी आकाश स्वच्छ राहत असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मागील काही दिवसांत तर सातारा शहराचा पारा कायम ३० अंशावर राहिला आहे. तर काही दिवस तो ३३ ते ३५ अंशादरम्यान होता. यामुळे दुपारच्या सुमारास सूर्य तळपत असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.
पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात कमाल तापमानात मोठी वाढ झालेली आहे. यामुळे जमिनीचा ओलावा कमी होत चालला आहे. तर दुपारच्या उन्हाने शेतकरी तसेच मजूर घामाघूम होत आहेत. सध्या शेतकरी खरीप हंगामातील पिकांची काढणी आणि रब्बीच्या दृष्टीने पेरणीची तयारी करत आहेत. पण, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून त्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. त्यातच ढगाळ वातावरणही तयार होत नाही. यामुळे ऑक्टोबर हिटमध्येच त्यांना शेतीची कामे उरकावी लागत असल्याचे चित्र आहे.
त्याचबरोबर आगामी काळात आणखी ऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पारा ३५ अंशाचा टप्पा पार करण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यातच पावसाळा संपल्याने वातावरणात बदल झाला आहे. यामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
सातारा शहरात नोंद कमाल तापमान..
दि. १ ऑक्टोबर २५.०६, २ ऑक्टोबर २५.५, ३ ऑक्टोबर ३१.४, ४ ऑक्टोबर ३२.५, ५ ऑक्टोबर ३२.६, ६ ऑक्टोबर ३३.७, ७ ऑक्टोबर ३३.४, ८ ऑक्टोबर ३३.७, ९ ऑक्टोबर ३४.५, १० ऑक्टोबर ३३.७, ११ ऑक्टोबर ३२.८ आणि १२ ऑक्टोबर ३३.४