विनाकारण दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:39 AM2021-03-31T04:39:12+5:302021-03-31T04:39:12+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी किराणा दुकान मालकांविरुद्ध शिरवळ ...
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी किराणा दुकान मालकांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ हद्दीमध्ये असणाऱ्या त्रिमूर्तीनगर येथील किराणा दुकान सुरू असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिरवळचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार जयवंत घोरपडे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी संचारबंदी लागू असताना त्याठिकाणी दादासाहेब बाबुराव शिंदे (४५, रा. शिरवळ) यांच्या मालकीचे किराणा दुकान विनाकारण सुरू असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रात्रीच्या दरम्यान जारी केलेल्या संचारबंदीचा दादासाहेब शिंदे यांनी भंग केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार दादासाहेब शिंदे यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस हवालदार जयवंत घोरपडे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार धीरज यादव तपास करीत आहेत.