श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर ५३ लाख रुपये अर्पण
By Admin | Published: December 22, 2014 12:06 AM2014-12-22T00:06:03+5:302014-12-22T00:08:27+5:30
पुसेगाव यात्रा : अमेरिका, इंग्लंड, भूतान, नेपाळसह विविध देशांतील नोटांचाही समावेश
पुसेगाव : ‘इतर राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुसेगावात आलेल्या भाविक-भक्तांनी एकाच दिवसात ५३ लाख १८ हजार ८२ रुपयांची देणगी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर मनोभावे अर्पण केली. श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त दि. २० डिसेंबर रोजी पुसेगाव, ता. खटाव येथे रथोत्सव सोहळा उत्साहात झाला. रथ मिरवणुकीदरम्यान रथावर अमेरिका, इंग्लंडसह विविध देशांतील परदेशी चलनांच्या नोटाही अर्पण केल्या. गतवर्षीच्या रकमेपेक्षा यावर्षी तीन लाख १७ हजार ८२ रुपयांनी वाढ झाली आहे,’ अशी माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.
तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांच्या भाविक, भक्तांच्या संख्येत वर्षानुवर्षे वाढ होत आहे. गतवर्षीच्या रथोत्सवात पन्नास लाख एक हजार रुपये देणगी जमा झाली होती. यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याने शेतकऱ्यांसह सर्वच स्तरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने यावर्षी देणगी रक्कमेत लक्षणीय वाढ झाली आहे.
श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस शनिवारी सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला आणि रात्री साडेदहा वाजता मिरवणूक संपवून रथ माघारी मंदिरात पोहोचला. श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिरासमोर रथावरून नोटांच्या माळा व परदेशी चलन काढून एकत्र करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्तात ही सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री. सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, अॅड. विजयराव जाधव यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली. रात्री अकरा वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले.
रथावरील देणगी रक्कम मोजण्याकरिता बँक आॅफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, न्यू सातारा समूह, यशवंत ग्रामीण पतसंस्था, कराड अर्बन बँक, मायणी अर्बन बँक, ज्ञानदीप को-आॅप बँक, सेवागिरी सहकारी पतसंस्था, सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था, शिवशक्ती सहकारी पतसंस्था, शिवकृपा, कराड मर्चट पतसंस्था, शिवशक्ती पतपेढी व विविध बँका, पतसंस्था व वित्तसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व स्वंयसेवकांनी देणगी मोजण्याचे काम पाहिले. यावेळी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. सचिव अविनाश देशमुख, सहसचिव मारुती वाघ, रघुनाथ दळवी यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी ३ लाख १७ हजारांची वाढ...
श्री सेवागिरी महाराजांचा लौकिक दिवसेंदिवस वाढत चालला, आहे. गेल्या साठ वर्षांत रथावर जमा होणाऱ्या रकमेत कधीही घट झाली नाही. यावर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावरील देणगी रक्कमेत तीन लाख १७ हजार ८२ रुपयांनी वाढ झालेली आहे. भारतीय चलनाबरोबरच इतर देशांतील चलनी नोटा भक्तांनी रथावर अर्पण केल्या. यामध्ये युनायटेड अरब अमिरातीच्या चार धीरमच्या १७ नोटा, कतारचा सहा रियाल, सौदी अरेबियाची दहा धीरमची एक नोट, इंग्लंडच्या ५५ पौंडच्या तीन नोटा, यूएसएची डॉलरची एक नोट, कुवेत, बांग्लादेशच्याही नोटांचाही यामध्ये समावेश आहे.(वार्ताहर)