पदाधिकाऱ्यांनी कारवाईची हिम्मत ठेवावी : कल्पनाराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:25 AM2019-12-17T11:25:51+5:302019-12-17T11:27:52+5:30
पदाधिकारी असो की कर्मचारी कोणीही कोणाच्या दबावाखाली काम करू नये. जर काही अडचण असेल, तर थेट कारवाईची हिम्मत ठेवा, असा सल्ला कल्पनाराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
सातारा : पदाधिकारी असो की कर्मचारी कोणीही कोणाच्या दबावाखाली काम करू नये. जर काही अडचण असेल, तर थेट कारवाईची हिम्मत ठेवा, असा सल्ला कल्पनाराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी सकाळी दहा वाजता आघाडीतील नगरसेवकांनी बैठक पार पडली. या बैठकीला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती सविता फाळके, आरोग्य सभापती विशाल जाधव, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता पवार, नगरसेविका स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक आदी उपस्थित होते.
नगरसेवक विनोद ऊर्फ बाळासाहेब खंदारे यांनी पालिकेत केलेल्या आंदोलनाचा कल्पनाराजे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, ह्यपदाधिकारी असो कर्मचारी कोणीही दबावाखाली काम करू नये. जर काही अडचण असेल तर थेट कारवाई करा.
सभागृहाची उंची कमी होईल, असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडू नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. सातारकरांचे प्रश्न अन् त्यांच्या अडचणी या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या प्राधान्याने सोडवा,ह्ण अशा सूचना करतानाच कल्पनाराजे यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावाही घेतला.
मल्हारपेठेतील महिलांवर आगपाखड
नगरसेवक खंदारे यांच्या प्रभागातील काही महिला स्वच्छतागृहाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पालिकेत आल्या होत्या. सभागृहात बैठक सुरू असतानाच त्या सभागृहात जाण्याचा वारंवार प्रत्यत्न करीत होत्या. ही बाब नजरेस पडताच कल्पनाराजे भोसले यांनी सभागृहातून बाहेर येत संबंधित महिलांचा खरपूस समाचार घेतला.
महिलांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्या म्हणाल्या, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची व दुरुस्तीची जबाबदारी एकट्या पालिकेची नाही तर ती नागरिकांचीदेखील आहे. जर तुम्हाला त्यांची निगा राखता येत नसेल तर प्रत्येकाने आपल्या घरात स्वच्छतागृह बांधावे. यासाठी पालिका अनुदान देत आहे. स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी नगराध्यक्षांना दिल्या.