वन कर्मचाऱ्यांच्या पगारावर कार्यालयाचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:39 AM2021-03-17T04:39:55+5:302021-03-17T04:39:55+5:30

रहिमतपूर : रहीमतपूर येथील वनपरिमंडल कार्यालयाचे भाडे वरिष्ठ पातळीवरून मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना स्वत:च्या पगारातूनच ते भागवावे लागत आहे. एक ...

Office dollars on forest staff salaries | वन कर्मचाऱ्यांच्या पगारावर कार्यालयाचा डोलारा

वन कर्मचाऱ्यांच्या पगारावर कार्यालयाचा डोलारा

Next

रहिमतपूर : रहीमतपूर येथील वनपरिमंडल कार्यालयाचे भाडे वरिष्ठ पातळीवरून मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना स्वत:च्या पगारातूनच ते भागवावे लागत आहे. एक वनरक्षक पद रिक्त असून, पेट्रोल भत्ताही तुटपुंजा आहे. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांच्या पगारावरच कार्यालयाचा डोलारा कसाबसा उभा आहे.

कोरेगाव तालुक्यातील रहीमतपूर वनपरिमंडळ कार्यालयाच्या देखरेखीखाली वनविभागाचे एकूण १८९०.१६ हेक्टर वनक्षेत्र आहे. यामधील न्हावी बुद्रुक बीटमध्ये न्हावी बुद्रुकसह पवारवाडी, वेळू, तारगाव, नलवडेवाडी या गावांच्या हद्दीत ९४८.७३ हेक्टर क्षेत्र आहे, तर नागझरी बीटमध्ये नागझरीसह आर्वी, कोंबडवाडी या गावातील हद्दीत ९४१.४३ हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे. वनक्षेत्रासह वनक्षेत्र नसलेल्या सुमारे ५२ गावांतील शिकारी रोखणे, पीक नुकसान प्रकरण बनवून ते मिळवून देणे, वनसंरक्षण, रोप लागवड, संवर्धन, तीन वर्षांतून एकदा वन्यप्राणी गणना करणे आदी कामे वनकर्मचाऱ्यांना करावी लागतात.

रहीमतपूर वनपरिमंडळासाठी एक वनपाल आणि दोन वनरक्षक असे कर्मचारी आहेत. त्यामधील एक वनरक्षक पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. दोघांवरच तिघांच्या कामाची अतिरिक्त जबाबदारी पडली आहे. त्यामुळे तातडीने रिक्त असलेले वनरक्षक पद भरणे गरजेचे आहे. वन विभागाचे कार्यालय खासगी मालकाच्या खोलीत आहे. त्याचे भाडे शासनाकडून मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना आपल्या पगारातूनच ते भागवावे लागत आहे. अडगळीच्या ठिकाणी कार्यालय असल्याने अनेकांना कामानिमित्त कार्यालयाची शोधाशोध करावी लागते. एवढी विदारक अवस्था वनविभागाची झाली आहे.

चौकट :

स्वमालकीच्या इमारतीचा अभाव

रहीमतपूर येथे महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, पाेलीस प्रशासन, वीज वितरण कंपनी आदी शासकीय विभागाची सर्व कार्यालये स्वमालकीची आहेत. केवळ वन विभागालाच स्वमालकीची इमारत नाही. इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे वन विभागाचीही स्वमालकीची इमारत उभी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चौकट :

रात्र गस्तीसाठी दुचाकीवरून भिरकीट

रहीमतपूर परिसरात वनविभागाचे क्षेत्र विखुरलेले आहे. त्यामुळे रात्र गस्तीसाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फिरावे लागते. गस्तीसाठी चारचाकी वाहनाची सोय वनविभागाने न केल्याने दुचाकीवरूनच वनपाल आणि वनरक्षकांची भिरकीट सुरू असते. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे मिळणारा भत्ता तुटपुंजा ठरत असल्याने भत्त्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. रात्र गस्तीसाठी चारचाकी वाहनाची सोय शासनाने करावी, अशी मागणी होत आहे.

फोटो : १६ रहीमतपूर-वनविभाग

रहीमतपूर, ता. कोरेगाव येथील वन परिमंडलाचे कार्यालय छोट्याशा अडगळीतील खोलीत सुरू आहे. (छाया : जयदीप जाधव)

Web Title: Office dollars on forest staff salaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.