अधिकारी रजेवर; तपास वाऱ्यावर!

By admin | Published: February 27, 2015 09:13 PM2015-02-27T21:13:10+5:302015-02-27T23:23:47+5:30

आर्थिक फसवणूक : स्वस्त कर्जाच्या आमिषाने लाखोंचा गंडा घालणारे मोकाट

Officer on leave; Inquire! | अधिकारी रजेवर; तपास वाऱ्यावर!

अधिकारी रजेवर; तपास वाऱ्यावर!

Next

सातारा : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याची तक्रार नोंदवून महिना उलटला तरी संशयितांचा मागमूस तर लागत नाहीच; उलट तपासी अधिकारी रजेवर असल्याचे सांगितले जात आहे, असे स्वस्त कर्जाच्या आमिषाने १ लाख ४० हजारांच्या फसवणुकीचे बळी ठरलेले सारंग गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, ‘त्याच’ व्यक्तींच्या फसवणुकीचे बळी ठरलेले संभाजी जगताप हे गायकवाड यांना शोधत आले. त्यांची तब्बल ९ लाख ८० हजारांची फसवणूक झाली आहे.
राहुल शर्मा, प्रीती शर्मा आणि रिया नावाच्या व्यक्तींनी दिल्लीची कंपनी असल्याचे सांगून आॅनलाइन कर्जाची आॅफर गायकवाड यांना १९ नोव्हेंबर २०१४ रोजी दिली होती. ‘रिलायन्स कॅपिटल’ असे कंपनीचे नाव असल्याचे सांगितल्यामुळे गायकवाड यांचा त्यावर विश्वास बसला. कालांतराने विविध चार्जेसच्या स्वरूपात रक्कम वसूल करताना कंपनीचे नाव ‘रिलायन्स फायनान्स लिमिटेड’ (आरएफएल) असे सांगितले जाऊ लागले. व्यावसायिकांना व्यवसायवृद्धी करण्यासाठी पाच टक्के दराने कंपनी कर्जपुरवठा करते, असे फोनवरून सांगण्यात आले. आपल्याला १५ ते २० लाखांपर्यंत गरज असल्याचे गायकवाड यांनी प्रीती शर्मा यांना सांगितले होते. वसुली सुलभ होण्यासाठी विमा पॉलिसी आधी उतरवावी लागेल, असे सांगून ५० हजार रुपये भरण्यास गायकवाड यांना सांगण्यात आले. इतके पैसे आपल्याकडे नसल्याचे सांगताच ही रक्कम २५ हजार इतकी करण्यात आली आणि गायकवाड यांनी ती धनादेशाद्वारे भरली.
कंपनीच्या नियमानुसार साठ हजार भरणे आवश्यक असून, तुम्ही केवळ २५ हजारच भरले आहेत, असे काही दिवसांनी फोनवरून सांगण्यात आले. उर्वरित ३५ हजार गायकवाड यांनी ८ डिसेंबर २०१४ रोजी भरले. त्यानंतर या मंडळींनी ‘कंपनीकडून तुम्हाला साडेआठ लाखांचा बोनस मंजूर झाला आहे,’ अशी गोड बातमी देऊन रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ५० हजारांचा धनादेश भरण्यास सांगितले. तो त्यांनी १९ डिसेंबर २०१४ रोजी भरला. त्यानंतर ‘स्टार बिझनेस सोल्यूशन’ ही नवीच कंपनी उगवली आणि ‘आरएफएल’च्या कर्जासाठी काही ‘चार्जेस’ भरण्यास सांगण्यात आले. त्यापोटी ३० हजार रुपये गायकवाड यांनी ‘एचडीएफसी’ बँकेतील कंपनीच्या खात्यात भरले. एवढे करूनही या मंडळींचे ‘चार्जेस’ संपले नाहीत. अंतिम प्रक्रियापूर्तीसाठी आणखी ३५ हजार मागण्यात आले तेव्हा गायकवाड यांना संशय आला आणि त्यांनी शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविली. संबंधितांविरुद्ध फसवणुकीसह तीन गुन्हे दाखल करण्यात आले; मात्र तपासाबाबत सारंग गायकवाड यांना अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. (प्रतिनिधी)

पालकमंत्र्यांना निवेदन
तपासाबाबत माहिती घेण्यास गेले असता सहायक पोलीस निरीक्षक तावरे यांच्याकडे तपास असल्याचे गायकवाड यांना सांगण्यात आले. मात्र, ते रजेवर असल्याचे त्यांना अजूनही सांगण्यात येते. यासंदर्भात गायकवाड यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांनाही निवेदन दिले आहे. त्यावर शेरा लिहून पालकमंत्र्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात पाठविले. तावरे अद्याप रजेवरून आले नसल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या अनुपस्थितीत तपास कुणाकडे, याचेही उत्तर मिळेनासे झाले आहे. दरम्यान, वाढे फाटा येथे राहणारे संभाजी जगताप हे गायकवाड यांचा शोध घेत आले. राहुल शर्मा, प्रीती शर्मा आणि रिया याच नावाच्या मंडळींनी दिल्लीतील कंपनीच्या नावावर आपली तब्बल ९ लाख ८० हजारांची फसवणूक केल्याचे त्यांनी गायकवाड यांना सांगितले. या गैरव्यवहारांमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, कमी व्याजदराच्या, आॅनलाइन कर्जाच्या आमिषापासून दूर राहणेच हितावह ठरले आहे.

Web Title: Officer on leave; Inquire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.